नवी दिल्ली, दि. 2 - उत्तरप्रदेशातील गरीब मुलींच्या लग्नासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यासाठी खासदार, आमदार आणि समाजातील प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पावलावर पाऊल टाकत योगी आदित्यनाथ सरकारने हा निर्णय घेतला. योगी आदित्यनाथ सरकारकडून सामुदायिक विवाह सोहळ्याअंतर्गत एका मुलीसाठी 35 हजार रुपये खर्च करणार आहे. याआधी राज्य सरकारकडून 20 हजार रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, आता 35 हजार रुपयांसोबत एक स्मार्टफोन देण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याअंतर्गत एका मुलीसाठी 35 हजार रुपये खर्च करणार आहे. यापैकी 20 हजार रुपये थेट मुलीच्या खात्यात जमा होतील. याशिवाय उर्वरित 10 हजार रुपये कपडे, भांडी आणि दागिने खरेदी करण्यासाठी वापरले जातील. तर 5 हजार रुपये लग्न मंडपासारख्या खर्चासाठी देण्यात येणार आहे. याचबरोबर एक स्मार्टफोन सुद्धा भेटवस्तू म्हणून दिला जाणार आहे.