ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 6 - कुटुंब नियोजनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रत्येक राज्यातील आरोग्य विभागाकडून निरनिराळ्या कल्पना राबवल्या जातात. अशीच काहीशी आगळीवेगळी तसंच भन्नाट कल्पना आता उत्तर प्रदेश सरकारकडून राबवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून नवविवाहित जोडप्यांना ""शगुन"" देण्यात येणार आहे. आशा वर्कर्सतर्फे नवविवाहित जोडप्यांना शगुन देण्यात येणार आहे.
कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आशा वर्कर्स घराघरात जाऊन नवविवाहित जोडप्यांना शगुनचं हे आगळवेगळं किट देणार आहे, ज्यात कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या या जोडप्यांना दिल्या जाणार आहेत.
शगुनच्या या किटमध्ये आरोग्य विभागातर्फे एक पत्रही दिलं जाणार आहे, या पत्रात कुटुंब नियोजनाच्या फायद्यांसंदर्भात माहिती असणार आहे.
नवविवाहित जोडप्यांना लोकसंख्या नियंत्रणाबाबत सूचना देण्यासोबत 2 मुलांपर्यंत कुटुंब मर्यादित ठेवण्यासंदर्भातही प्रोत्साहन देणे हा या पत्राचा उद्देश आहे. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस. या पार्श्वभूमीवर 11 जुलैपासून या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.
""मिशन परिवार विकास""चे प्रोजेक्ट मॅनेजर अवनीश सक्सेना यांनी सांगितले की, नवविवाहित जोडप्यांना कौटुंबिक व वैवाहिक जीवनातील कर्तव्यं जबाबदारीनं पार पाडण्यासाठी योग्य पद्धतीनं तयार करणं हा या योजनेचा उद्देश आहे. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी नवविवाहित दाम्पत्यांना या नवीन उपक्रमांतर्गत देण्यात येणा-या शगुन किटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या कंडोमचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशातील नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, आशा वर्कर्स हेल्थ किट नवविवाहितांना देतील. ज्या नवविवाहित दाम्पत्य निरक्षर आहेत त्यांना याबाबतची संपूर्ण माहिती देण्याची जबाबदारी आशा वर्कर्सची असणार आहे.
आणखी बातम्या वाचा
काही दिवसांपूर्वी एचआयव्ही-एड्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एड्स हेल्थ केअर फाऊंडेशनच्यावतीने (एएचएफ) मोफत कंडोम सुविधा सुरू करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार भारतात 2.1 मिलियन लोक एचआयव्ही - एड्स बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातीतील एचआयव्ही-एड्स बाधित रुग्णांचा आकडा पाहता इतर देशांच्या तुलनेत भारत तिस-या क्रमांकावर आहे. दरम्यान, हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ""लव्ह कंडोम"" या नावाने मोफत कंडोम देण्याचा उपक्रम एड्स हेल्थ केअर फाऊंडेशन या संस्थेकडून सुरु करण्यात आला आहे.
या संस्थेकडून फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून कंडोमची ऑर्डर स्वीकारली जाईल आणि ती घरापर्यंत पोहचवण्याचे काम करण्यात येईल, असे एएचएफने म्हटले आहे. सार्वजनिक स्तरावर पहिल्यांदाच मोफत कंडोम देण्याचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जास्त प्रभाव असलेल्या भागात सरकारकडून मोफत कंडोम पुरवठा करण्यात आला. मात्र, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.