नवी दिल्ली-
मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा योगी सरकार सत्तेत आल्यानंतर विविध घोषणा करण्यात येत आहेत. यापैकीच एक मोठं पाऊल उत्तर प्रदेश सरकारनं उचललं आहे. मुंबईत जवळपास ५० ते ६० लाख उत्तर भारतीय नागरिक राहतात. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी मुंबईतच उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती योगी सरकारकडून देण्यात आली आहे.
एकीकडे राज ठाकरे यांच्या परप्रांतिय विरोधी भूमिकेमुळे त्यांना उत्तर प्रदेशात होणारा विरोध वाढत असतानाच योगी सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत लवकरच उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय उभारलं जाणार असून याठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांचे नोकरी तसेच व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत यातून केली जाणार आहे, अशी घोषणा योगी सरकारकडून केली आहे. योगी सरकाच्या या निर्णयावर महाराष्ट्रात आता राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध होत आहे. काही वर्षांपासून राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याचेच पडसाद आता उत्तर प्रदेशात उमटू लागले आहेत. भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी शक्तीप्रदर्शन करत राज ठाकरेंना कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशात रॅली काढण्यात आली आहे. आजच्या बैठकीला ५० हजार लोकं उपस्थित राहतील. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही तोवर त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही असा इशारा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.