बांदा-
उत्तर प्रदेशातील बांदा येथे योगी सरकारचे मंत्री गिरीश चंद्र यादव यांना रात्री उशिरा विषारी कीटकानं दंश घेतला. त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावू लागली तेव्हा त्यांना साप चावला असल्याचा संशय आला. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि मंत्र्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे अडीच तास चाललेल्या उपचारानंतर साप नव्हे तर उंदरानं दंश केल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बुंदेलखंडमधील लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कशी सुरू आहे ते तपासण्यासाठी राज्यमंत्री गिरीश चंद्र यादव शुक्रवारी बांदा जिल्ह्यात पोहोचले होते. यावेळी ते मवई बायपास येथील सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. दरम्यान, रात्री 3 वाजण्याच्या सुमारास अचानक झोपेत असताना त्यांना विषारी किटकांनी चावा घेतला. सर्किट हाऊसच्या आजूबाजूला घनदाट जंगल असल्यानं सर्पदंशाच्या भीतीनं मंत्रीमहोदयांचे सर्व कर्मचारी भयभीत झाले. याची माहिती मिळताच जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. वेदना वाढू लागल्यावर मंत्री महोदयांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याचवेळी डीएमशी संपर्क साधल्यानंतर एडीएम, नगर दंडाधिकारी, पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरा सर्वांनी जिल्हा रुग्णालयात तळ ठोकला. सुमारे अडीच तासांनंतर म्हणजेच पहाटे मंत्र्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. खबरदारी म्हणून प्रशासनाने रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली होती.
रुग्णालयाचे डॉ. एस.एन. मिश्रा यांनी सांगितले की, काल रात्री मंत्री गिरीश चंद्र यादव यांना एका किड्यानं चावा घेतला. आजूबाजूला जंगल असल्यानं मंत्र्याला साप चावला असावा असं वाटलं. रात्री तीनच्या सुमारास त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. सापानं नव्हे तर उंदरानं चावा घेतल्याची खात्री झाल्यावर त्यांना सकाळी ५ नंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता मंत्र्यांची प्रकृती ठीक आहे.