सुनील चावके/आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूरमध्ये आपल्या मातेच्या झालेल्या हत्येविषयी आपण आदराने बोलत आहे. माझी एक आई येथे बसली आहे, दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारले आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसा बंद करणार नाही, तोपर्यंत दररोज तुम्ही माझ्या आईची हत्या करीत आहात, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर लाेकसभेत केला.
सैन्य एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकते. सैन्याचा तुम्ही प्रयोग करत नाही. कारण, तुम्ही भारताला मणिपूरमध्ये मारू इच्छिता. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन शिंपडत आहात. तुम्ही मणिपूरमध्ये केरोसिन ओतले आणि आग लावली. तेच तुम्ही हरयाणात करीत आहात. संपूर्ण देशाला जाळण्यात तुम्ही गुंतले आहात. संपूर्ण देशात तुम्ही भारतमातेची हत्या करीत आहात, असा आरोप राहुल यांनी केला.
मुलाला डोळ्यादेखत गोळ्या मणिपूरच्या मदत शिबिरामध्ये मी गेलो. माझ्या एकुलत्या एक छोट्या मुलाला डोळ्यादेखत गोळ्या घातल्याचे एका महिलेने तिथे सांगितले. रात्रभर त्याच्या प्रेतासोबत राहिल्यानंतर भीतीपोटी आपण अंगावरील कपड्यांनिशी घर सोडल्याचे सांगून तिने मुलाचा फोटो दाखवला. आपल्यापाशी आता एवढेच उरले आहे, असे ती म्हणाली.
ओम बिर्ला यांचे मानले आभारभाषणाच्या सुरुवातीला लोकसभेत सदस्यत्व पुनर्स्थापित केल्याबद्दल राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. आज अदानींवर बोलणार नसल्यामुळे माझ्या भाजपच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही. आज मी बुद्धीने नाही तर हृदयातून बोलणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान भाजपचे सदस्य वारंवार व्यत्यय आणत होते. ओम बिर्ला त्यांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन करूनही सभागृहातील वातावरण तापले होते.
प्रक्षेपणावरून आरोप-प्रत्यारोपसंसदेत मणिपूरच्या मुद्द्यावर बुधवारी चर्चा सुरू होती. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बोलण्यास प्रारंभ केला. त्यांच्या भाषणाच्या वेळी सभागृहात गदारोळ झाला. राहुल गांधी लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर १५ मिनिट ४२ सेकंद बोलले. या कालावधीत संसद टीव्हीवर ११ मिनिट आठ सेकंद केवळ सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांचा चेहरा दाखविण्यात आला, असा आरोप राहुल गांधी यांच्या भाषणानंतर काँग्रेसने केला आहे.
केवळ चारच मिनिटे...राहुल गांधी यांना केवळ चार मिनिटे संसद टीव्हीवर दाखवण्यात आले, असाही काँग्रेसने आरोप केला आहे. टीएमसीच्या लोकसभा खा. महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे की, जेव्हा भाजपचे नेते भाषण देत होते, तेव्हा संसद टीव्हीचा त्यांच्यावरील कॅमेरा हटत नव्हता; परंतु, विरोधी पक्षांची आघाडी इंडियाचे नेते बोलत होते, तेव्हा तातडीने लोकसभा अध्यक्षांना टीव्हीवर दाखविले जात होते.