ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - लवकरच सुरू होणा-या कबड्डी वर्ल्डकपच्या पत्रकार परिषदेत प्रमुख पाहुणा म्हणून गेलेले माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या रागाचा पार चढला आणि त्याचा फटका एका पत्रकाराला बसला. ' कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाचा समावेश का नाही' असा सवाल एका पत्रकाराने त्यांना विचारला असता ते भडकले आणि त्यांनी ' तुम्ही भारतीय नाही का' असा उलट सवाल केला. भारतीय कबड्डी संघांची घोषणा आणि जर्सीच्या अनावरणासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीच हा प्रकार घडला. ' जर तुम्ही भारतीय असाल तर असा प्रश्न विचारताच कामा नये. ही काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे का?' अशा शब्दांत कपिल यांनी त्या पत्रकाराला झापले. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये केलेल्या हल्ल्यात एकूण १९ जवान शहीद झाले असून या हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासीय संतापले असून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. असे असतानाच एका पत्रकाराने पाकिस्तानी खेळाडूंचा प्रश्न उपस्थित करताच कपिलपाजी संतापले.
दरम्यान अहमदाबादमध्ये ७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत कबड्डी विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुपकुमार याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. तर मनजीत चिल्लर हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल.