नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपानंही आता मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरवलं आहे. मोदींनीही प्रचारसभेत केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पार्टी आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. त्यातच भाजपा या आंदोलनाचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा उचलत असल्याचा आरोप आपच्या अरविंद केजरीवालांनी केला आहे. तर भाजपाचे नेते मनोज तिवारी आणि खासदार परवेश वर्मा हे शाहीन बाग आंदोलनावरून आम आदमी पार्टीवर पलटवार करत आहेत. त्याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केजरीवालांवर घणाघाती टीका केली आहे.दिल्लीतली जनता त्यांच्या बाजूनं उभी होती, तिनंसुद्धा आता त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे. त्याचंही एक कारण आहे. त्यामुळे केजरीवाल केविलवाणा चेहरा करून मी काय आतंकवादी आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. पण केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत. मी अराजकवादी आहे, असं केजरीवालांनी स्वतः सांगितलं आहे. अराजकवादी आणि दहशतवाद्यांमध्ये जास्त फरक नसतो, असं म्हणत जावडेकरांनी केजरीवालांवर टीकास्त्र सोडलं आहे.