झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या ८१ जागांसाठी मतदान होणार आहे. याआधी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटोगे तो कटोगे' म्हणत काँग्रेसवर टीका केली. या टीकेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले.
"वाटणारे तुम्ही आणि फूट पाडणारेही तुम्हीच" असा पलटवार मल्लिकार्जुन खरगे यांनी सीएम आदित्यनाथ यांच्यावर केला. खरगे म्हणाले की, तुम्ही वाटणारे आणि फूट पाडणारेही तुम्हीच आहात. यावेळी खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. रांची येथील सभेत खरगे यांनी लोकांना विचारले की, वारंवार खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कसे मतदान करता? भाजपला तुमच्या लोकांमध्ये फूट पाडायची आहे, असा आरोपही खरगे यांनी केला.
सभेत बोलताना खरगे म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे झारखंडमधील भाषण म्हणजे जुमला आहे. त्यांच्या गृहमंत्र्यांनी आधी २ कोटी तरुणांना रोजगार देणार असल्याचे सांगितले, पण नंतर त्यांनी ही निवडणूक घोषणा असल्याचे सांगितले. हे लोक नेहमी खोटे बोलतात. यापूर्वी त्यांनी प्रत्येकी १५ लाख रुपये देण्याचेही सांगितले होते. सवयीच्या खोटे बोलणाऱ्याला तुम्ही कसे मतदान करत आहात?, असा सवालही खरगेंनी केला.
यावेळी खरगे म्हणाले, वाटणारे लोक हेच आणि फूट पाडणारेही हेच आहेत. हा भाजप-आरएसएसचा अजेंडा आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांचा अजेंडा मोडत नाही तोपर्यंत ते तुमचे शोषण करत राहतील, असंही खरगे म्हणाले.