नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचाराबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या अन्य पाच नेत्यांनी माझ्यासह कुटुंबियांविरुद्ध खोटी आणि बदनामीकारक विधाने केल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिल्ली न्यायालयात बाजू मांडताना केला आहे. जेटलींनी आपच्या नेत्यांविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे.जेटली यांनी मंगळवारी न्यायालयात हजर होत निवेदन नोंदविले. चोख सुरक्षा बंदोबस्तात ते न्यायालयात आले होते. केजरीवाल यांच्यासोबत काम करणाऱ्या एका विशिष्ट व्यक्तीचा सीबीआयकडून तपास केला जात असताना लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने खोटी विधाने करण्यात आली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयात बंदद्वार सुनावणी प्रक्रिया सुरू असताना पोलिसांनी पत्रकारांना आतमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. जेटलींनी २१ डिसेंबर रोजी केजरीवालांसह आपचे नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजयसिंग, राघव चड्डा, दीपक वाजपेयी यांच्याविरुद्ध अब्रुहानीचा खटला दाखल केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)जेटलींनी भादंवि कलम ४९९(बदनामी), ५०० (शिक्षा), ५०१ आणि ५०२ ( बदनामीकारक मजकुराचे मुद्रण आणि विक्री) नुसार गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार नोंदविली. केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी १५ डिसेंबरपासून माझ्यासह कुटुंबीयांविरुद्ध खोटे, वाईट हेतूने प्रेरित आणि बदनामीकारक विधाने करीत मोहीम उघडली आहे. माझे कधीही भरून न निघणारे नुकसान करण्याच्या समान हेतूने राजकीय लाभासाठी त्यांनी आरोप केले आहेत. जेटलींनी तक्रारीत आप नेत्यांनी पत्रपरिषदेत केलेल्या विधानांचा उल्लेख केला. जेटली हे डीडीसीएचे अध्यक्ष असतानाच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला.
आप नेत्यांची विधाने खोटी; जेटलींचा कोर्टात दावा
By admin | Published: January 05, 2016 11:28 PM