'तुम्ही लॉलीपॉपसारखे बिल...; सोनिया गांधींच्या भाषणानंतर निशिकांत दुबेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 01:28 PM2023-09-20T13:28:18+5:302023-09-20T13:29:01+5:30
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. या विधेयकाच्या श्रेयावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. यानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. आता या विधेयकाच्या श्रेयावरुन दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सोनिया गांधीच्या भाषमानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गांधींना प्रत्युत्तर दिले.
"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती
भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले, सुषमा स्वराज आणि गीता मुखर्जी यांनी या महिला आरक्षणाविरोधात सर्वाधिक आवाज उठवला आणि सोनिया गांधी यांनी या दोन महिलांचे नावही घेतले नाही. तुमच्या सरकारने आणले असे तुम्ही म्हणता. हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले विधेयक आहे.
दुबे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला या ऐतिहासिक विधेयकावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. याआधी काँग्रेसने कधी धाडस दाखवले नव्हते आणि आम्ही विधेयक आणले तेव्हा त्यांना पोटदुखी होत आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद भारतात आरक्षणाचा प्रश्नच नाही, मग तुम्ही त्याची मागणी का करत आहात? तुम्ही ज्याप्रमाणे हे विधेयक लॉलीपॉप बनवत फिरत राहता तेच काम भारतीय जनता पक्षानेही करावे असे तुम्हाला वाटते." खरे तर हे विधेयक राजीव गांधींचे स्वप्न असून काँग्रेसने हे विधेयक आणल्याचे सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितले. यावरही दुबे यांनी प्रत्युत्तर दिले.
खासदार दुबे म्हणाले, "आमच्याकडे असे पंतप्रधान आहेत जे म्हणतात की मी जे काही सुरू करतो ते मी संपवतो. जर हे महिला आरक्षण विधेयक इथे आले तर महिलांना आरक्षण मिळेल आणि एकत्र राहून मदत करतील, कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. हे लोक पुन्हा देशात चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी जनगणना होईल आणि मग महिलांना आरक्षण मिळेल, असंही दुबे म्हणाले.