आधार ओळखपत्र आता देशामध्ये महत्वाचे कागदपत्र ठरले आहे. न्यायालयाने आधार सक्ती करण्यास नकार दिलेला असला तरीही ओळखपत्र म्हणून आधारचा वापर सरकारी कामांमध्ये होत आहे. तुम्ही जर आधार ओळखपत्रासाठी अद्याप अर्ज केला नसाल तर जवळच्या पोस्टामध्ये जाऊन आधारसाठी अर्ज करावा. तसेच यावेळी तुमचा रहिवासाचा पत्ता, जन्म प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
जर तुम्ही आधीच आधार कार्डसाठी अर्ज केला असेल आणि ते आले नसेल तर तुम्ही UIDAI वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला एक काम आणखी करावे लागणार आहे. तुमचा मोबाईल नंबर जर आधार काढतेवेळी नोंद केलेला नसेल तर तुम्हाला आधार कार्ड डाऊनलोड किंवा प्रिंट करता येणार नाही. यामुळे आधार नोंदणीवेळी तुमचा नंबर देणे आवश्यक असणार आहे.
नोंदणीवेळी तुमचा नंबर रजिस्टर केलेला नसल्यास किंवा नंबर बंद झाल्यास तुम्हाला अनेक समस्या भेडसावू शकतात. नावात बदल, पत्ता, जन्मदिनांक, लिंग, इमेल यासारखे बदल करायचे झाल्यास तुम्हाला सारखे सारखे नोंदणी केंद्रावर जावे लागणार आहे. यापेक्षा मोबाईल नंबर रजिस्टर असल्यास ही कामे तुम्हाला वेबसाईटवरून सहज करता येणार आहेत. मोबाईल नंबर रजिस्टर किंवा बदलायचा असल्यास तुम्हाला नोंदणी केंद्रावरच जाणे गरजेचे आहे.
लहान मुलांसाठीही आधार कार्ड काढावे लागत आहे. अशावेळी त्यांचा तेव्हाचा फोटो आणि तरुण वयातील फोटोमध्ये कमालीचा बदल झालेला असतो. यामुळे पालकांचा नंबर देऊन आधार रजिस्टर करता येते. मात्र, वयाच्या 15 वर्षांनंतर फोटो बदलायचा झाल्यास त्यासाठी नोंदणी केंद्रात जावे लागणार आहे.
नोंदणी केंद्र पाहण्यासाठी तुम्हाला युआयडीएआयच्या वेबसाईटवर “Locate Enrolment Center” ला जावे लागणार आहे. याठिकाणी तुमच्या जवळचे केंद्र दिसणार आहे. या केंद्रावर जाऊन 50 रुपयांच्या शुल्कामध्ये तुम्ही मोबाईल नंबर, आधार पत्ता किंवा बायोमेट्रीक अपडेट करता येणार आहे.
आधार हरविल्यास काय?आधार नोंदणी नंबर किंवा आधार कार्ड हरविल्यास तसेच मोबाईल नंबर रजिस्टर नसल्यास तुम्हाला जवळच्या नोंदणी केंद्रावर जावे लागणार आहे. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असल्यास तुम्ही वेबसाईटवरून “Retrieve Lost UID/EID” द्वारे आधार किंवा नोंदणी नंबर मिळवू शकता.