'तुम्ही फसवणूक करून ज्युनियर खेळाडूंचा हक्क ..."; ब्रिजभूषण सिंह यांचा विनेश फोगटवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:01 PM2024-09-07T12:01:12+5:302024-09-07T12:03:11+5:30
भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आज कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यावर आरोप केले.
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काही दिवसापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगट यांनी आरोप केले होते, सिंह यांच्यावर विरोधात दिल्लीत आंदोलनही केले होते. दरम्यान, आता हरियाणा विधानसभा निवडणुकीआधी फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी फोगटवर आरोप केले आहेत.
बजरंग पुनिया-विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काय म्हणाले भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह? पाहा VIDEO
कुस्तीपटूंनी विरोधात केलेल्या आंदोलनावर बोलताना सिंह म्हणाले, "या हालचाली दोन वर्षांपूर्वी सुरू झाल्या होत्या. “जवळपास दोन वर्षांपूर्वी या खेळाडूंनी १८ जानेवारीला कट रचला. हे राजकीय षडयंत्र आहे, असे मी म्हटले होते. यामध्ये काँग्रेसचा सहभाग होता, दीपेंद्र हुडा यांचा सहभाग होता, भूपेंद्र हुडा यांचा सहभाग होता. संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली होती. हे खेळाडूंचे आंदोलन नव्हते आणि आता जवळपास दोन वर्षांनंतर या नाटकात काँग्रेसचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे, असंही ब्रिजभूषण सिंह म्हणाले.
'मी मुलींचा दोषी नाही, जर मुलींचा कोण दोषी असेल तर ते बजरंग आणि विनेश आहे. त्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टची जबाबदारी भूपेंद्र हुड्डा यांच्यावर आहे. सुमारे अडीच वर्षे त्यांनी कुस्ती जवळजवळ बंद केली, असा आरोपही ब्रिजभूषण सिंह यांनी केला.
ब्रिजभूषण सिंह म्हणाले, 'बजरंग चाचणीशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत गेला हे खरे नाही का? मला कुस्ती तज्ञ आणि विनेश फोगट यांना विचारायचे आहे की, एक खेळाडू एका दिवसात दोन वजनात ट्रायल देऊ शकतो का? वजन उचलल्यानंतर पाच तास कुस्ती थांबवता येईल का? तुम्ही नियमाबद्दल बोलत आहात, खेळाडूने एका दिवसात दोन वजनी गटात ट्रायल द्याव्यात, असा नियम आहे का? पाच तास कुस्ती थांबली नव्हती का? रेल्वे रेफरी वापरत नव्हते का? कुस्ती जिंकून गेला नाहीत, फसवणूक करून गेलात, ज्युनियर खेळाडूंच्या हक्काचे उल्लंघन करून गेलात, देवाने तुम्हाला तिथेच शिक्षा केली आहे, असा टोलाही सिंह यांनी लगावला.