संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. दोन्ही नेत्यांमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांवरून आरोप प्रत्यारोप झाले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ज्योतिरादित्य शिंदे हे उत्तर देत होते. त्यावेळी अरविंद सावंत यांनी चर्चेत उडी घेतली आणि या वादाला तोंड फुटले.
धानोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मी माननीय खासदार महोदयांना विचारू इच्छितो की, त्यांचं सरकार असताना बीएसएनएलची स्थिती काय होती. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने बीएसएनएलला ३.३५ लाख कोटी रुपये दिले. त्यानंतर ९ हजार कोटी रुपयांनी तोट्यात असलेली ही कंपनी आज २ हजार कोटी रुपये नफा कमवत आहे.
बीएसएनएलवर चर्चा सुरू असतानाचा अरविंद सावंत यांनीही चर्चेत उडी घेतली. एमटीएनएलच्या सेवेबाबत त्यांनी सांगितले की, अनेक दशकांपासून ही सेवा मुंबई आणि दिल्लीमध्येच सुरू आहे. मात्र २०१४ नंतर किती खासदार बीएसएनएळचा वापर करत आहेत. इथे सगळ्यांकडे जिओ आहे. खासदार केवळ मोफत सेवा आहे म्हणूनच बीएसएनएलचा वापर करतात, असा दावाही त्यांनी केल्या.
त्यावर ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले आणि सांगितले की, तुम्ही आव्हान देऊ नका. संसदेमध्ये केवळ एमटीएनएल आणि बीएसएनएलच चालतं. वातावरण तापलेलं असताना ज्योतिरादित्य शिंदे अरविंद सावंत यांना उद्देशून ‘’तुम्ही माझ्याजवळ येऊन बसा, असं म्हणाले. बीएसएनएलचे ५५ हजार कर्मचारी आणि त्यांची जबाबदारी आमच्यावर आहे, असेही त्यांनी सांगितले.