हैदराबाद - तेलंगणातील निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून ओवैसी बंधुच्या विखारी टिकेला भाजप उमेदवार टी राजासिंग यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. घोशामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या राजासिंग यांनी ओवैसी बंधुंवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच हल्लाबोल केला. तू 15 मिनिटांचे काय सांगतोस, फक्त 5 मिनिटांसाठी एल.बी. स्टेडियममध्ये ये, आपण दोघे कबड्डी खेळू, मग तुला समजेल, अशा शब्दात राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांना आव्हान दिले आहे.
अरे जेव्हा 15 मिनिटांची गोष्ट करतो, मी तुला केवळ 5 मिनिटंच बोलवतो. मी माझी सुरक्षा सोडतो, तू तुझी सुरक्षा सोड. एलबी स्टेडियममध्ये ये, 5 मिनिटांची कबड्डी खेळू आणि मग पाहू. कोण येथे वाचतो ते. राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवैसीच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे. गतनिवडणुकांवेळी अकबरुद्दीन ओवैसींने भडकाऊ भाषण केले होते, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, केवळ 15 मिनिटांसाठी देशातील पोलीस हटवा, मग बघू कुणामध्ये किती दम आहे ते ? अशा शब्दात हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण केलं होते. तर यंदाही निवडणूक प्रचारांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी शब्दात टीका केली. ओवैसींच्या या टिकेचा राजासिंग यांनी समाचार घेतला. भाजप नेते आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष टी राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवैसीला एलबी स्टेडियममध्ये ये, आपण कबड्डी खेळू असे म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा केली. रविवारी हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी योगींनी सभा घेतली. त्यावेळी, तेलंगणातभाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार. तसेच हैदराबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. त्यावर, ओवैसी बंधूनीही योगींच्या टिकेला उत्तर दिले. तेलंगणामध्ये निवडणुकांतील या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.