मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला, ते भावुक झाले. त्यानंतर, सोशल मीडियातून अनेकांनी त्यांनी खिल्ली उडवली. आता, खासदार इम्तियाज जलिल यांनीही मोदींच्या भावूकपणाला अभिनय म्हटलंय. तसेच, देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तर आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन ‘दीदी ओ दीदी’ असं करत होते, असा टोलाही लगावला आहे.
राज्यातील लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्य सरकारनं लॉकडाऊन संपवला नाही तर १ जूनपासून औरंगाबादमध्ये सर्व दुकानं उघडू आणि लॉकडाऊनचा निषेध करू, अशी ठाम भूमिका एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे. यासोबतच, जलिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावूक झालेल्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली.
'पंतप्रधानांचं तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. या देशात त्यांचे भक्तही ऐकणार नाही. कारण, जेव्हा देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तर आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन ‘दीदी ओ दीदी’ असं करत होते. आता लोक त्यांना ‘दादा गप्प बस दादा’.. म्हणणार आहेत. आता ती वेळ आली असून स्वत: पंतप्रधानांनी ती आणली आहे. आता टीव्हीवर येऊन रडण्याचं काही कारण नाही. आम्हाला माहिती आहे कोण कसा अभिनय करतं. लोकांना सांभाळण्याची वेळ होती तेव्हा जाऊन प्रचार करत होतात, लाखोंच्या संख्येने गर्दी गोळा करत होतात आणि आता ज्ञान पाजळत आहात,' अशा शब्दात जलिल यांनी मोदींवर टीका केलीय.
चंद्रकांत खैरेनी दिलं प्रत्युत्तर
"इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत. ते जर दुकानं उघडायला आले तर शिवसैनिक उत्तर देतील. लॉकडाऊन उघडलं तर तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनानं इम्तियाज जलील यांच्यावर तातडीनं कारवाई करावी", अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.