डेहराडून : स्वातंत्र्यपूर्व काळात भारताची पारंपरिक आरोग्य आणि औषधी पद्धती जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आली. कारण आम्ही गुलाम देश होतो. एवढेच नाहीतर स्वातंत्र्योत्तर काळातही एकापाठोपाठ आलेल्या सरकारलाही या वैशिष्ट्यपूर्ण औषधी पद्धतीला उभारी देण्याचा विसर पडला, हे दुर्दैव होय. भारताच्या पारंपरिक चिकित्सा पद्धती आणि योग आदी शास्त्रांना चालना देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात फारसे प्रयत्न झाले नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली.योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वारस्थित पतंजली योगविद्यापीठाच्या संशोधन संस्थेच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चिकित्सालयीन चाचण्या आणि आयुर्वेदिक औषधींच्या अत्याधुनिक आवेष्टणासाठी ही उच्चतंत्रज्ञानयुक्त संशोधन संस्थेची स्थापना करून पतंजली योगविद्यापीठाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आयुर्वेदिक औषधी अत्याधुनिक पद्धतीने आवेष्टित केल्यास जगभरात त्यांचा चढाओढीने स्वीकार केला जाईल. आयुर्वेदाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर जागृती केल्याबद्दल पंतप्रधानांनी बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रशंसाही केली. यावेळी पतंजली योगविद्यापीठाने पंतप्रधान मोदी यांना ‘राष्ट्रऋषी’ उपाधी प्रदान केली. बाबा रामदेव यांनी माझा सन्मान करून मला आश्चर्यचकित केले, असेही मोदी म्हणाले. याचा अर्थ असा की, आमच्या अशा अपेक्षा असून, त्या पूर्ण कराव्यात, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझा स्वत:वर एवढा भरवसा नाही, तेवढा सव्वाशे कोटी भारतीयांच्या आशीर्वादावर आहे.आचार्य बालकृष्ण यांनी संकलित केलेल्या विश्वकोशाचे (वर्ल्ड हर्बल इनसायक्लोपिडिया) प्रकाशनही केले. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर होत आहे. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासंबंधित प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मंजूर करण्यात यश मिळविल्याबद्दल बाबा रामदेव यांनी मोदी यांना विश्वगुरू म्हणून संबोधले. यावेळी आचार्य बालकृष्ण यांनी संकलित केलेल्या विश्वकोशाचे (वर्ल्ड हर्बल इनसायक्लोपिडिया) प्रकाशनही केले. राज्यपाल के.के. पॉल, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आदी उपस्थित होते.मोदींनी घेतले केदारनाथाचे दर्शनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडस्थित आठव्या शतकातील जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिरात पूजा आणि रुद्राभिषेक करून बाबा केदरानाथांचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी ८.३० वाजता मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडण्यात आल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी दर्शन घेतले. त्यांनी जवळपास २० मिनिटे पूजा केली. व्ही.पी. सिंह यांच्यानंतर २८ वर्षांनंतर केदारनाथला भेट देणारे मोदी हे भारताचे तिसरे पंतप्रधान होत. मंदिर परिसरात सकाळपासून भक्त आणि स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली होती. मोदी यांनी हात उंचावत त्यांना अभिवादनही केले.
पारंपरिक उपचार पद्धतीच्या प्रसारात आपण कमी पडलो
By admin | Published: May 04, 2017 1:13 AM