राजकीय फायद्यासाठी तुम्ही पंचकुला जळू दिलं - हरयाणा उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 02:16 PM2017-08-26T14:16:08+5:302017-08-26T14:19:21+5:30

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारावरुन पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने हरयाणा सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

You forcibly burnt Panchkula for political benefit - Haryana High Court | राजकीय फायद्यासाठी तुम्ही पंचकुला जळू दिलं - हरयाणा उच्च न्यायालय

राजकीय फायद्यासाठी तुम्ही पंचकुला जळू दिलं - हरयाणा उच्च न्यायालय

Next

चंदीगड, दि. 26 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारावरुन पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने हरयाणा सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. राजकीय फायद्यासाठी तुम्ही पंचकुला जळू दिले असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 29 ऑगस्टला होणार आहे. त्यावेळी गुरमीत राम रहीमच्या पंजाब-हरयाणामधील चल आणि अचल संपत्तीची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

शुक्रवारीच पंजाब, हरयाणा आणि अन्य राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. झालेले सर्व नुकसान डेरा सच्चा सौदाकडून भरुन घ्यावे असे आदेशच न्यायालयाने दिले होते. कोर्टाने सार्वजनिक संपत्तीचे जे नुकसान झाले आहे त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरज पडली तर, शस्त्रही चालवा असा आदेशच उच्च न्यायालयाने हरयाणा सरकारला दिला होता. साध्वी बलात्कार प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तरप्रदेशमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाल. शेकडो वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला असून, 250 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. 

पंचकुलामध्ये जमावाने सुरक्षापथकांवरच हल्ला केला. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना तेथे हवेत गोळीबारही करावा लागला. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना मागे हटावे लागले. निकालाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या 53 तुकडया आणि हरयाणा पोलिस दलाचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले होते तसेच पंजाब, हरयाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये 72 तासांठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.

दरम्यान साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम एक सामान्य कैदीच असून त्याला एसी, मदतनीस अशी चैनीची कोणतीही सुविधा दिलेली नाही असे हरयाणाचे तुरुंग अधिकारी के.पी.सिंह यांनी सांगितले. काही वृत्तवाहिन्या, पेपर्स राम रहीमला विशेष वागणूक दिल्याच्या बातम्या दाखवत आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करतो राम रहीम सुनारीया तुरुंगात आहे, कुठल्याही अतिथिगृहात नाही त्यामुळे त्याला कोणत्याही वेगळया सुविधा दिलेल्या नाहीत असे के.पी.सिंह यांनी सांगितले. 

Web Title: You forcibly burnt Panchkula for political benefit - Haryana High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.