बडोदा : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान होण्यासाठी भाजपाच्या मंत्र्यांकडून मतदारांना धमकावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता भाजपाच्याचगुजरातच्या मंत्र्याचे नाव या यादीमध्ये आले आहे. पाण्याचा प्रश्न घेऊन गेलेल्या महिलांना या मंत्र्याने मला तुम्ही 55 टक्केच मते दिली, पाणी तेवढेच मिळणार असे वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी व्हायब्रंट गुसरातचा नारा दिला होता. तसेच गुजरात कसे अग्रेसर आहे, गुजरातचा विकास याबाबत सांगत लोकांची मते जिंकली होती. मात्र, यानंतर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलन आणि अन्य प्रश्नांवर कांग्रेसने चांगलीच लढत दिली होती. गुजरातवर भाजपाचा निसटता विजय झाला असला तरीही त्याची सल तेथील नेत्यांमध्ये असल्याचे दिसत आहे. भाजपाचे पाणी पुरवठा मंत्री कुंवरजी बावलिया हे त्यांच्या मतदारसंघात फिरत असताना तेथील महिलांनी आपल्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. यावर मला विधानसभेसाठी विनंती करूनही 55 टक्केच मते दिलीत, असे प्रत्यूत्तर दिले. यावर भाजपाचे माजी आमदार भरत बोघारा यांनी पुढे बोलत 'आता तुम्हाला तेवढेच पाणी मिळेल', अशी धमकी दिली.