नवी दिल्ली - तुम्ही नेतृत्व करा, मी समन्वय करेन. आजच्या बैठकीत रणनीती बनण्याची अपेक्षा नाही. परंतु आपल्या पुढच्या २-३ बैठकांमध्ये रणनीती आखली जाऊ शकते. आपण भाजपाला १५० जागांपर्यंत रोखू शकतो. कारण त्यांच्याकडे केवळ ३७ टक्के मते आहेत असं विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या महाबैठकीत केले. शुक्रवारी पाटणा इथं विरोधकांची बैठक झाली. त्यात १५ विरोधी पक्षाचे २७ प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, महाबैठकीत देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाग घेतला. बैठक चांगली राहिली. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण सगळे एकत्र राहिलो तर भाजपाचा पराभव निश्चित आहे. आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आणि अंतिम बैठक १२ जुलैला शिमला इथं होईल. या बैठकीत कोण कोणत्या जागा लढवेल याबाबत निर्णय घेतला जाईल.
या बैठकीनंतर सर्व पक्षांनी काँग्रेस नेत्यांना बोलण्याची संधी दिली परंतु आम्ही शेवटी बोलू असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी सांगितले की, आम्ही या बैठकीला जुन्या सर्व गोष्टी विसरून आलो आहे. आमच्या मनात कुठलाही पूर्वग्रह नाही. भाजपा देशात हुकुमशाही पद्धतीने सर्व लोकशाही संस्था उद्ध्वस्त करत आहे. आपल्याला त्यांच्याशी लढायचंय असं त्यांनी बैठकीत मत मांडले. भारताच्या लोकशाहीच्या ढाच्यावर हल्ला केला जातोय. विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही विचारधारेची लढाई आहे. भाजपा आणि आरएसएसचे आक्रमक थांबवायला हवे असंही ते म्हणाले.
वटहुकुमावरून ‘आप’ची वेगळी चालआम आदमी पक्षाने दिल्लीशी संबंधित केंद्राच्या वटहुकुमावर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे सांगून विरोधी ऐक्याच्या संपूर्ण प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वटहुकमावर ‘आप’चे समर्थन करण्याच्या मुद्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्वत: पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.