मदुरै - एखाद्या संस्थेत अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीचा क्षण हा संबंधित व्यक्तीला, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि संस्थेला नक्कीच भावूक करणारा असतो. वर्षानुवर्षे दैनिक कामकाज, तेथील सहकाऱ्यांनी जुळलेला भावबंध, वस्तूंशी झालेला जिव्हाळा आणि कामाच्या उपकरणांशी जोडलेली नाळ त्या व्यक्तीला निवृत्तीदिवशी भावूक करते. म्हणूनच, आपण सोशल मीडियात निवृत्तीच्या घटनांचे काही व्हिडिओ पाहिले असतील. आता, तामिळनाडूतील राज्य ट्रान्सपोर्टच्या विभागाच्या एका चालकाचा भावूक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नोकरीच्या शेवटच्या दिवशी चालक मुथुपांडी यांना अश्रू अनावर झाले होते, तर बसला चक्क मिठी मारुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चालक मुथुपांडी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, ते दररोज चालवत असलेल्या बसच्या ड्रायव्हर सीटवर बसले आहेत. निवृत्तीच्या दिवशी बसचं स्टेअरींग हाती घेत, त्याचा मुका घेत आपलं प्रेम आणि निवृत्तीच्या भावना व्यक्त करताना दिसून येतात. ते गेल्या ३० वर्षांपासून तामिळनाडू स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या बसचे चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी मदुरै जिल्ह्यातील अनुपनादी-थिरुपरांगुनराम-महालक्ष्मी कॉलोनी मार्गावर बस चालवली. मात्र, या बसचा निरोप घेताना ते भावूक झाले होते.
समाजात आज माझा जो मान-सन्मान आहे, तो केवळ या नोकरीमुळे, या बसचालक पदामुळेच. या नोकरीमुळेच मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकलो, कुटुंबांचे पालन-पोषण करु शकलो, असे मुथुपंडी यांनी यावेळी म्हटले. मुथुपंडी यांची आपल्या संस्थेसोबतचं नातं, कामाशी असलेले भावनिक बंध पाहून सर्वांनीच त्यांचं कौतुक केलंय. त्यांच्या सहकाऱ्यांनाही यावेळी भावना दाटून आल्या होत्या. बसला कवेत घेताना, स्टेअरींगचा मुका घेताना आणि डोळ्यातून अश्रू ढाळताना मुथुपंडी यांचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला असून लोकांनी त्यांचं कौतुक केलं. तसेच, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.