चेन्नई – कोईम्बतोरमधील कृषी विद्यीपाठीच्या गार्डनमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर एकतर तुम्ही विवाहित असणं गरजेचं आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. तुम्ही आणि तुमची पत्नी एकत्र असाल तरच या गार्डनमध्ये प्रवेश दिला जातो. जर तुम्ही अविवाहित असाल तर गेटवरुनच परत पाठवलं जातं. अविवाहित दांपत्यांना गार्डनमध्ये प्रवेश दिला जाऊ नये असा आदेशच सुरक्षारक्षकांना देण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या फ्लोरिकल्चर विभागाचे हेड प्रोफेसर एम कनन यांनी सांगितल्यानुसार, ‘पार्कात येणारी जोडपी आक्षेपार्ह चाळे करत असतात. काही विद्यार्थी आणि लोकांनी यासंबंधी तक्रार केली होती. पार्कात लपण्यासाठी आणि अश्लील चाळे करण्यासाठी जोडपी जागा शोधून ठेवतात. यामुळेच विद्यापीठाने हा नियम केला आहे’. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘आधी लोकांकडे त्यांचं ओळखपत्रं आणि फोन नंबर मागितले जात होते, पण यानंतरही पार्कात आक्षेपार्ह गोष्टी होत होत्या ज्यामुळे इतर लोकांना त्रास होत होता’.
विद्यापीठाच्या या निर्णयाशी काही विद्यार्थी असहमत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, जर विद्यापीठ प्रशासनाला अविवाहित जोडप्यांमुळे त्रास होत असेल तर मग त्यांनी सुरक्षा वाढवावी तसंच सीसीटीव्हीसारखे उपाय करावेत. एका विद्यार्थ्याने म्हटलं आहे की, अशाप्रकारे लोकांना पार्कात जाण्यापासून रोखणं बेकायदेशीर आहे.
एका अन्य व्यक्तीने आरोप केला आहे की, आपण विवाहित असतानाही तुम्ही फक्त मुलांसोबत आतमध्ये जाऊ शकत नाही असं सांगत रोखण्यात आलं. आपल्या मित्रासोबत गेलो असतानाही अशाच प्रकारे रोखण्यात आल्याचं ते बोलले आहेत.
हे पार्क सकाळी आठ वाजल्यापासून ते 11.15 आणि दुपारी 2.30 ते 4.45 पर्यंत खुलं असतं. पार्कात फुलपाखरांवर संशोधन करण्यासाठी येणा-या व्यक्तीने सांगितलं की, फुलपाखरं 10 वाजता दिसण्यास सुरुवात होते. पण आपण काही अभ्यास करण्याआधीच पार्क बंद होऊन जातं.
विद्यापीठाच्या अधिका-यांचं म्हणणं आहे की, ‘पार्कात येणा-या काही अविवाहित जोडप्यांवर पोलीस केस असल्या कारणाने हा नियम तयार करावा लागला. अनेकदा दांपत्यांची जोरदार भांडणं होतात. हे पार्क संशोधन आणि विद्यापीठाच्या कामासाठी तयार करण्यात आलं आहे.