हैदराबाद - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्पने भारताच्या प्रगतीचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली. नरेंद्र मोदींचा साधा चहावाला ते पंतप्रधानपदापर्यंतचा जो प्रवास आहे त्याबद्दल इव्हांकाने मोदींचेही कौतुक केले. जागतिक उद्योजकता शिखर परिषदेच्या उदघाटनाच्या सत्रात इव्हांका बोलत होती.
तुम्ही जो पल्ला गाठलाय तो अदभुत आहे. चहावाला ते पंतप्रधानपदापर्यंतचा तुमचा प्रवास पाहिला तर बदल घडू शकतो हे तुम्ही सिद्ध करुन दाखवले असे इव्हांका म्हणाली. महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय मानवतेची प्रगती होऊ शकत नाही या मोदींनी मांडलेल्या विचाराबद्दलही इव्हांकाने मोदींचे कौतुक केले.
महिला सक्षमीकरण आपल्या सरकारच्या विकासाच्या अजेंडयाच्या केंद्रस्थानी असल्याचे मोदींनी सांगितले. भारतात भारतासाठी आणि जगासाठी गुंतवणूक करा, भारताच्या विकासामध्ये भागीदार होण्यासाठी मी तुम्हा सर्वांना निमंत्रित करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत (जीईएस) इव्हांका ट्रम्प सहभागी झाली आहे. 36 वर्षीय इव्हांका या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारही आहेत. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्या करणार आहेत. अमेरिकेच्या 38 राज्यांतील 350 प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत. भारत-अमेरिका यांच्यातर्फे होणा-या या परिषदेसाठी हैदराबादचे सुशोभीकरण केले आहे.
शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान व डिजिटल अर्थव्यवस्था, माध्यम व मनोरंजन यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदी आणि इव्हांका ट्रम्प यांच्यासह पाहुण्यांसाठी फलकनुमा राजवाड्यात निजामकालीन टेबलावर स्नेहभोजन होणार आहे.जगभरातील उद्योजक, नवोन्मेषी कल्पक उद्योजक, गुंतवणुकदार यांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणजेच जागतिक उद्योजकता शिखर परिषद 2017 (जीईएस) हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. यावर्षी महिला उद्योजक आणि महिला उद्योजकांमध्ये असणारी शक्ती यावर परिषद विचारमंथन करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व सल्लागार इवान्का ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.