लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ट्रेन सुटल्यानंतर दहा मिनिटांपर्यंत प्रवासी सीटवर पोहोचला नाही तर तो आता विनातिकीट असेल. त्याची जागा दुसऱ्या प्रवाशाला दिली जाईल. आता टीटीई कर्मचारी एक-दोन स्थानकांपर्यंत प्रवाशांची वाट पाहणार नाहीत. रेल्वे बोर्डाने प्रवाशांना त्यांच्या जागेवर पोहोचण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी निश्चित करणारा आदेश जारी केला आहे.
रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास करणारे प्रवासी घाईमुळे किंवा सोयीमुळे काही वेळा इतर डब्यांमध्ये चढतात. एक-दोन स्थानकांनंतर ते सीटवर पोहोचतात. मात्र, आता असे होणार नाही. रेल्वेने बहुतांश गाड्यांमधील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना हँड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ते प्रवाशांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवतात.आता टीटीईला १० मिनिटांत माहिती अपडेट करावी लागेल. जर प्रवासी सीटवर पोहोचला नाही, तर ती सीट आरएसी किंवा प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रवाशाला उपलब्ध करून दिली जाईल. प्रवाशांनी आपल्या सीटवर वेळेत जाण्यासाठी ज्या बोगीत आपली सीट आहे तेथे उभे राहणे आवश्यक झाले आहे.
यापूर्वी काय होते? एका टीटीईने सांगितले की, मशीन येण्यापूर्वी मॅन्युअल चार्ट तयार करण्यात येत असे. यात १५ मिनिटे किंवा स्टेशन सोडेपर्यंत वाट पाहिली जात होती. आता केवळ १० मिनिटे देण्यात येत आहेत. मात्र, गर्दी असल्यास टीटीई कर्मचाऱ्यांना प्रवाशापर्यंत पोहोचण्यास अधिक वेळ लागू शकतो.
नव्या प्रणालीअंतर्गत आता प्रवाशांना ज्या स्थानकावरून प्रवासाचे तिकीट आहे, त्याच स्टेशनवर ट्रेनमध्ये चढावे लागेल. बोर्डिंग स्टेशनवर प्रवासी न मिळाल्यास अनुपस्थित म्हणून नोंद केली जाईल. त्यात कोणताही बदल होणार नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. - रघुवीर सिंग शेखावत, सरचिटणीस, रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी संघटना.