बदलत्या जीवनशैलीचा नातेसंबंधांवरही विकृत परिणाम होताना दिसत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीशेजारी असलेल्या नोएडा येथून समोर आला आहे. येथे एका महिलेने तिचा पती, त्याचा मित्र आणि मित्राच्या पत्नीवर वाईफ स्वॅपिंगचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडितेने सांगितले की, तिचा पती तिला जबरदस्तीने दारू पाजतो. तसेच मॉर्डन बनण्यासाठी दबाव आणतो. या सर्वाला विरोध केल्यानंतर त्याने माझ्यासोबतचं नातं तोडलं.
पीडित महिला ही मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे. तिचा विवाह मुरादाबाद येथील एका तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर ती पतीच्या कुटुंबासोबत नोएडामधील सेक्टर-१३७ मधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहू लागली. तिने ९ जून रोजी पती आणि इतर ९ जणांविरोधात तक्रार दिली होती.
पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये लिहिले की, माझी सासू म्हणते मी माझ्या पतीला खूश ठेवू शकत नाही. माझ्या पतीच्या एका मित्राच्या पत्नीचं वारंवार उदाहरण देत ती माझ्यावर दबाव आणते. तिच्याकडून पतीला कसं खूश केलं पाहिजे, हे शिक असे टोमणे मारत राहते. एवढंच नाही तर पतीसोबत कधी संबंध ठेवायचे, कधी नाही, हे सुद्धा माझी सासूच ठरवते.
महिलेने तक्रारीमध्ये पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षी १८ एप्रिल रोजी ती तिच्या पतीसोबत सेक्टर ७५ मधील एका फ्लॅटमध्ये पार्टीसाठी गेली होती. तिथे तिच्या पतीचा मित्र त्याच्या पत्नीसोबत आला होता. पार्टीमध्ये पतीने तिला जबरदस्तीने मद्य पाजले. तसेच मित्रासोबत झोपण्यासाठी दबाव आणू लागला. तसेच त्याच्या मित्राची पत्नी त्याच्यासोबत झोपेल, असं त्याने सांगितलं. याला वाईफ स्वॅपिंग म्हणतात. जेव्हा पीडितेने असं करण्यास नकार दिला, तेव्हा संतापून त्याने तिला सोडण्याची धमकी दिली.
त्यानंतर महिलेने पती, सासू, सासरे, नणंद, पतीचा मित्र, मित्राची पत्नी यांच्यासह ९ जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. तिने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये हुंड्यासाठी छळ, यासह अनेक कलमे लावण्यात आली आहे. आता हे प्रकरण महिला पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिक तपास करत आहेत.