नवी दिल्ली - या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला. एनजीओ सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) ने २०२३ मध्ये हवामानाच्या अत्यंत तीव्र परिस्थितीवर जारी केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सुमारे ८६ टक्के दिवसांमध्ये (२३५ दिवस) हवामानाची स्थिती अत्यंत तीव्र होती. म्हणजेच प्रचंड थंडी, प्रचंड उष्णता आणि अतिपाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा अशी परिस्थिती निर्माण झाली.
हिवाळा नेहमीपेक्षा जास्त उष्णया वर्षीच्या हिवाळ्यात तापमानाशी संबंधित आकडेवारी पाहिल्यास, जानेवारी महिना सरासरीपेक्षा किंचित गरम होता, तर फेब्रुवारी २०२३ मध्ये तापमान सामान्यापेक्षा खूप जास्त नोंदवले गेले. १२२ वर्षांतील फेब्रुवारी हा सर्वांत उष्ण होता. फेब्रुवारीचे सरासरी तापमान सामान्यापेक्षा १.३६ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले. उत्तर-पश्चिम भारतात तापमान सरासरीपेक्षा २.७८ अंश जास्त होते.
पुढील वर्षीही पूर, आगीची संकटे...संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेने गुरुवारी सांगितले की २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे आणि चिंताजनक ट्रेंड भविष्यात पूर, जंगलातील आग, हिमनदी वितळणे आणि अति उष्णतेमध्ये वाढ सूचित करतात. सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे.