लखनौ - उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहलच्या २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटाकरत याचिका फेटाळून लावली आहे. आज तुम्ही ताजमहालाच्या खोल्यांची तपासणी करण्याची मागणी करत आहात. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जायची मागणी कराल. ताजमहल कोणी बनवला ते शोधा, अभ्यास करा, पीएचडी करा आणि त्यानंतर न्यायालयात या, अशा कडक शब्दात न्यायालयाने ताशेरे ओढले आहे.
हिंदू देवतांच्या मूर्तीं आहेत की नाही तपासण्यासाठी ताजमहालमधील २२ बंद खोल्या उघडण्याची विनंती करणारी याचिका फेटाळली आहे. ताजमहालच्या २२ खोल्यांच्या चौकशीची मागणी करणारी सुनावणी आज म्हणजेच गुरुवारी संपली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर भाजपचे युवा मीडिया प्रभारी रजनीश सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये ताजमहालमधील 22 बंद दरवाजे उघडून हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत की नाही हे पाहण्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला निर्देश देण्याची मागणी केली होती. अनेक खोल्या बंद असल्याची माहिती मिळाली असून सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्या बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायला पाहिजे, असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.
या याचिकेत सत्य शोध समितीची स्थापना आणि एएसआयने अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांनी हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याच्या दाव्यांचाही उल्लेख केला आहे.