नवी दिल्ली :
रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये उपलब्ध जेवणाच्या मेनूमध्ये बदल केले असून, रेल्वेत प्रवाशांना प्रादेशिक खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. लिट्टी-चोख्यापासून इडली-सांबारपर्यंत अनेक पदार्थांचा त्यात समावेश आहे. नव्या बदलानुसार, जैन धर्मीयांना शुद्ध शाकाहारी तसेच मधुमेहाचा त्रास असलेल्या प्रवाशांना उकडलेल्या भाज्या आणि ओट्स दिले जातील.
‘आंतरराष्ट्रीय संपूर्ण धान्य वर्ष-२०२३’च्या पार्श्वभूमीवर, रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये भरड धान्याच्या आठ डिशेसचा समावेश केला आहे. नव्या बदलानंतर ट्रेनमध्ये बाळाच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत या सर्व प्रीमियम ट्रेनमध्ये २६ जानेवारीपासून हा बदल लागू झाला आहे.
रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये ३ वर्षांहून अधिक काळानंतर बदल केला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये रेल्वेने ट्रेनच्या कॅटरिंग मेनूमध्ये बदल केला होता. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रादेशिक लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. लिट्टी-चोखा, इडली-सांभार, डोसा, बडा पाव, पावभाजी, भेळपुरी, खिचडी, झालमुडी, व्हेज-नॉन-व्हेज मोमोज, स्प्रिंग रोल आदी प्रादेशिक पदार्थ आता रेल्वेत मिळतील.
मधुमेहींसाठी स्वतंत्र पदार्थमधुमेहाचा त्रास असलेल्या प्रवाशांना उकडलेल्या भाज्या, मिल्क-ओट्स, मिल्क-कॉर्न फ्लेक्स, अंड्याचे पांढरे ऑम्लेट आदी पदार्थ दिले जातील. शाकाहारी जेवण : जैन धर्मीय प्रवाशांसाठी रेल्वेत शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.