अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना सोमाभाई भावूक झाले. 'मी पंतप्रधान मोदींना सांगितले की तुम्ही देशासाठी खूप मेहनत करत आहात, आता थोडी विश्रांतीही घ्या. एक भाऊ असल्याने मला एवढेच म्हणायचे आहे की, त्याला मेहनत करताना पाहून आनंद होतो,' अशा भावना सोमाभाई यांनी व्यक्त केल्या.
सोमाभाई मोदी पुढे म्हणाले की, मला मतदारांना एक संदेश द्यायचा आहे की, त्यांनी आपल्या मताचा योग्य वापर करावा आणि अशा पक्षाला मतदान करावे जो देशाची प्रगती करेल. 2014 पासून केलेल्या विकास कामांकडे जनता दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्या आधारावरच मतदान केले जात असल्याचे' सोमाभाई म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले. मतदानासाठी पंतप्रधान मोदीही सकाळी या शाळेत पोहोचले होते. मतदान केल्यानंतर ते पायीच सोमाभाई मोदींच्या घरी पोहोचले.
पीएम मोदी काय म्हणाले?मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल मी देशातील नागरिकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. निवडणूक आयोगाचेही मी मनापासून अभिनंदन करतो. भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा जगभर उंचावत अतिशय नेत्रदीपक पद्धतीने निवडणुका घेण्याची मोठी परंपरा विकसित केली आहे. गुजरातची जनता समजूतदार आहे, त्यांचा मी ऋणी आहे.'