नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा लहान मुलांना भेटतात, त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या भेटीदरम्यान अनेकदा मजेशीर किस्से घडतात. असाच एक किस्सा संसद भवनातील भैटीदरम्यान घडला. एका 5 वर्षीय मुलीने पंतप्रधान मोदींना दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची संसद भवनात भेट घेतली. या भेटीत पीएम मोदींनी फिरोजियांच्या 5 वर्षीय चिमुकलीशी खास बातचित केली. या संवादादरम्यान पीएम मोदींनी चिमुकल्या अहानाला विचारले की, 'ती त्यांना ओळखते का? यावर अहानाने उत्तर दिले, होय. तुम्ही मोदी आहात. तुम्ही रोज टीव्हीवर येता. यावर पंतप्रधानांनी अहानाला विचारले की, मी काय करतो हे तिला माहीत आहे का? त्यावर अहाना म्हणाली, हो. तुम्ही लोकसभेत काम करता.' यावेळी चिमुकल्या अहानाचे उत्तर ऐकून पीएम मोदींसह उपस्थित सर्व लोक हसायला लागले. यानंतर पीएम मोदींनी अहानाला चॉकलेट दिले. तसेच, मोदींनी अनिल फिरोजिया यांचे वजन कमी केल्याबद्दल कौतुकही केले.कोण आहेत अनिल फिरोजिया?अनिल फिरोजिया हे भाजपचे तेच खासदार आहेत, ज्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी 24 फेब्रुवारी रोजी उज्जैनला आले होते. विकासकामांच्या घोषणांमध्ये त्यांनी आरोग्याबाबतही सल्ला देत खासदार अनिल फिरोजिया यांना आव्हान दिले. गडकरी म्हणाले होते की, फिरोजिया यांनी वजन कमी करावे, प्रत्येक किलोग्रॅममागे त्यांच्या भागाला एक हजार कोटींचा निधी दिला जाईल. गडकरींच्या या विधानानंतर फिरोजियांनी आतापर्यंत 21 किलो वजन कमी केले आहे, म्हणजेच त्यांनी आपल्या क्षेत्रासाठी 21 हजार कोटी रुपये निश्चित केले आहेत.