मुंबई/ बंगळुरू - बेळगावमध्ये मराठी आणि कानडी भाषिकांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. त्या घटनेचा उल्लेख छोटी घटना असा केल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही जोरदार टीका होत आहे. दरम्यान, या प्रकारावरून भाजपाने एक धक्कादायक दावा करत गंभीर आरोप केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा तरुण हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तसेच या तरुणाचे काँग्रेसचे कर्नाटकमधील बडे नेते डी.के. शिवकुमार यांच्यासह इतर नेत्यांसोबतचे फोटेही आता व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता कर्नाटक भाजपासह महाराष्ट्रातही भाजपाकडून या प्रकाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध करताना भाजपाचे नेते सी.टी. रवी म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मी निषेध करतो. कर्नाटकमधील राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी हे कृत्य घडवण्यात आले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या शिवरायांचा अवमान करणाऱ्या या कृत्याबाबत उद्धव ठाकरे सोनिया गांधींना जाब विचारतील का, असा सवालही रवी यांनी विचारला आहे.
तर महाराष्ट्र भाजपानेही कर्नाटक भाजपाने यासंदर्भात केलेले एक ट्विट रिट्वीट करत राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात काँग्रेसचा हात असेल आणि शिवसेना त्याला मूक संमती देत असेल, तर शिवरायांच्या सिंहासनापेक्षा लाचारीने मिळविलेल्या सत्तेची खुर्ची शिवसेनेला अधिक प्रिय वाटत आहे. हा शिवसेनेच्या लाचारीचा सर्वोच्च बिंदू आहे!, असा टोला भाजपाने लगावला आहे.