कोणी चहा विकत आहेत तर कोणी किराणामाल विकत आहेत, या छोट्या-छोट्या कामातून देशातील तरुण उद्योजकांनी करोडोंचा व्यवसाय उभा करून कोणताही व्यवसाय छोटा नसतो हे सिद्ध केलं आहे. गुजरातमधील अशाच एका तरुण उद्योजकाची यशोगाथा तुम्हाला सांगणार आहोत, ज्याने एमबीए केल्यानंतर भाजी विकायला सुरुवात केली आणि आता लाखो रुपयांची उलाढाल करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील रहिवासी असलेल्या मनीष जैन याने त्याचा स्टार्टअप Vegiee सुरू केला आणि त्याला त्याच्या व्यवसायात प्रचंड यश मिळाले. मनीषचे कुटुंबीय त्याच्या कामाच्या विरोधात असले तरी मनीष जैन याने वडिलांना विश्वासात घेऊन कुटुंबीय आणि नातेवाईकांना चुकीचे सिद्ध केलं आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे राहणारे मनीष जैन याने एमबीए केल्यानंतर व्यवसाय करण्याचा विचार केला, परंतु हा व्यवसाय शोरूम किंवा कारखाना काढण्याचा नव्हता तर भाजीपाला विकण्याचा होता. मुलाच्या या निर्णयावर वडील बोलू लागले की तू शिकून नाव का खराब करतोस. मात्र मनीष जैन याने नातेवाईकांचे ऐकले नाही.
भाजीपाला स्टार्टअपमध्ये यश
मनीष जैन याने 2016 मध्ये Vegiee स्टार्टअप सुरू केलं. त्यावेळी मनीषकडे फक्त 10,000 रुपये होते आणि त्याने बटाटे आणि कांदे विकायला सुरुवात केली, पण आज तो 40 हून अधिक भाज्या विकतोय. यामध्ये काही महागड्या भाज्यांचाही समावेश आहे.
वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक
आम्ही नेहमी ताज्या भाज्या देतो, आम्ही भाज्या साठवत नाही. त्यासाठी आम्ही रात्री ऑर्डर घेतो आणि सकाळी भाजीपाला पोहोचवतो. भाजीपाला स्टार्टअपमध्ये यशस्वी झाल्यानंतर मनीष जैन आता दुसराही व्यवसायही करत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, मनीषने सांगितले की त्याच्या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.