जगातील सर्वाधिक तरुण मंडळी असलेल्या देशांपैकी एक म्हणून काही वर्षांपूर्वी भारताकडे पाहिले जात होते. आजही भारत तरुणच आहे. जगातील भारत हा चौथा युवा देश आहे. असे असले तरी काहीशी चिंता वाढविणारी आकडेवारी येत आहे. भारत हळू हळू वार्धक्क्याकडे जाऊ लागला आहे.
जगातील युवा पिढीच्या यादीत नायजेरिया पहिला देश आहे, तर फिलिपिन्स दुसरा आणि बांगलादेश तिसरा देश आहे. १४० कोटी लोकसंख्य़ा असलेला आपला भारत देश चौथ्या क्रमांकावर आहे. भारतातील तरुणांच्या वयाची सरासरी काही वर्षांपूर्वी २४ वर्षे होती ती आता वाढून २९ वर्षांवर आली आहे. यानुसार तरुणांची संख्या घटत चालली आहे.
तरुणांचे जसजसे वय वाढू लागले आहे तसतसे त्यांची जागा घेणारी नवीन पिढी घटू लागली आहे. देशाच्या लोकसंख्येचा वाढीचा दर २०२४ मध्ये १ टक्क्यांवर आला आहे. हा दर १९५१ नंतरचा सर्वात कमी आहे. १९७२ ला लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक म्हणजे २.२ टक्क्यांवर होता.
देशात अखेरची जनगणना ही २०११ मध्ये झालेली आहे. तेव्हा देशाची लोकसंख्या ही १२१.१ कोटी एवढी होती. एसबीआयच्या अहवालानुसार ती वाढून आता १४२ कोटींवर गेली आहे. वय वाढू लागल्याने भारत येत्या काही वर्षांत वृद्धापकाळाकडे वाटचाल करणार आहे. वृद्धापकाळ आला की समस्याही अनेक असणार आहेत. ६० वर्षांवरील लोकांची संख्या ही २०५० पर्यंत ३४ कोटींवर पोहोचणार आहे. २०३६ मध्ये वृद्धांची संख्या ही एकूण लोकसंख्येचा १२.५ टक्के होणार आहे. ४० टक्के वृद्ध लोकसंख्या बीपीएलच्या खाली असणार आहे. १८.७ टक्के वृद्ध लोकांकडे उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत नाहीय. यामुळे सरकारला या लोकांसाठी निवारा, हॉस्पिटल, वैद्यकीय उपकरणे, स्वस्त दरात अन्न धान्य उपलब्ध करणे आदी गोष्टी उभाराव्या लागणार आहेत.
वाढत्या वृद्ध लोकसंख्येची काळजी घेण्यासाठी मनुष्यबळाचीही गरज लागणार आहे. यासाठी शिक्षण यंत्रणा, वाहतूक, हेल्थ इंडस्ट्री, हॉस्पिटल आदींचे जाळे उभारावे लागणार आहे.