ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केल्यापासून एका नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका काश्मिरी तरुणाला लष्कराच्या जीपला बांधलेला दिसत आहे. बडगाम येथे काही काश्मिरी तरुणांनी जवानांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ समोर आला होता.
या व्हिडीओत जो तरुण दिसत आहे त्याचं नाव फारुख अहमद धर असं आहे. इंडियन एक्स्प्रेसने त्याच्यापर्यंत पोहोचत त्याच्याशी बातचीत केली. "मी आपल्या जीवनात कधीच दगडफेक केलेली नाही. मी दगडफेक करणा-यांपैकी नसून छोटी, मोठी कामं करुन आपलं पोट भरतो", असं त्याने सांगितलं आहे.
फारुखच्या कुटुंबात तो आणि त्याची म्हातारी आई आहे. या घटनेबद्दल विचारलं असता फारुखने सांगितलं की, "त्या दिवशी आमच्या एका नातेवाईकाच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मी चाललो होते. रस्त्यात निदर्शने सुरु होती म्हणून मी तिथे थांबलो. तेवढ्यात काही जवानांनी मला पकडलं. मला मारहाण केली आणि जीपच्या पुढे बांधलं. अशाप्रकारे नऊ गावातून फिरवत मला सीआरपीएफ कॅम्पमध्ये नेण्यात आलं. तिथे मला खोललं आणि कॅम्पमध्येच बसवून ठेवलं".
फारुख सांगतो, "आपल्या माणसावर दगफेक करा अशी घोषणा त्यावेळी सीआरपीएफ जवान देत होते". या घटनेनंतर फारुख आणि त्याची आई प्रचंड घाबरले आहेत. याची तक्रारही ते करु इच्छित नाहीत. "मी गरीब माणूस आहे. कुठे तक्रार करणार, मला काहीच करायचं नाही. मी घाबरलेलो आहे, माझ्यासोबत काहीही होऊ शकतं", अशी भीती त्याने व्यक्त केली.
याच प्रश्नावर बोलताना त्याच्या 75 वर्षीय आईने आपला मुलगाच आपल्यासाठी सर्वस्व आहे. तो नसला तर मी कुठे जाणार असं म्हटलं आहे.
श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणा-या नराधमांची ओळख पटली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. जवानांवर हात उचलून त्यांच्या देशसेवेचा अपमान करणा-या काश्मिरी तरुणांना जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जवानांवर हात उचलणारे काश्मिरी तरुण बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सीआरपीएफने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता.