ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - मागच्या आठवडयात काश्मीर खो-यातून अटक करण्यात आलेला ‘लष्कर-ए-तैयबा’चा दहशतवादी संदीप शर्मा ऊर्फ आदिलने दहशतवादासाठी नव्हे तर, प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तपासातून समोर आले आहे. संदीप काश्मीरमध्ये एका युवतीच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबत लग्न करता यावे यासाठी त्याने धर्मपरिवर्तन करुन इस्लाम धर्म स्वीकारला.
संदीप ज्या कंत्राटदाराकडे नोकरी करायचा त्याला तपासयंत्रणांनी ताब्यात घेतले असून, याच कंत्राटदाराने संदीपला नोकरीसाठी काश्मीरला पाठवले होते. संदीप वेल्डींगचे काम करायचा. त्याने संदीपसह आणखी दोघांना त्याच कामासाठी काश्मीरला पाठवले होते.
काम संपल्यानंतर असीफ आणि योगेश उत्तरप्रदेशमध्ये परतले पण संदीप तिथल्या एका निवृत्त पोलीस अधिका-याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता अशी माहिती कंत्राटदाराने दिली. संदीप दुस-या धर्मतील असल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाला परवानगी नाकारली. त्यानंतर तिथल्या एका स्थानिक मशिदीत संदीपने इस्लाम धर्म स्वीकारुन आदिल हे नाव धारण केले. त्यानंतर त्याने मुस्लिम तरुणीशी विवाह केला.
संदीपने वेल्डींगच्या कामाव्यतिरिक्त अधिक पैसे मिळवण्यासाठी अनंतनाग-पुलवामा या भागात ड्रायव्हींग सुरु केली. पण त्यातून त्याला दिवसाला फक्त 300 रुपये मिळायचे अशी माहिती तपास अधिका-याने दिली. या दरम्यान संदीप शकूर या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादाच्या संपर्कात आला. शकूरने संदीपला पैशांचे आमिष दाखवले आणि त्याच्या वेल्डींगच्या कामाचा एटीएम लुटण्यासाठी वापर केला.
आणखी वाचा
दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणाऱ्या ‘लष्कर-ए-तैयबा’शी संबंधित गटाचा संदीप सक्रिय सदस्य होता. मुझफ्फरनगरचा संदीप कुमार शर्मा ऊर्फ आदिल व कुलगामचा मुनीब शाह या दोघांना अटक झाली आहे. आपल्या कारवाया तडीस नेण्यासाठी दहशतवादी संदीपचा वापर करून घेत.
त्याचे गुन्हेगारी आणि दहशतवाद यात लागेबांधेही उघडकीस आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये बँका लुटण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामागेही शर्माच्या गटाचा हात होता. तपासात त्याने काश्मीरमध्ये बँका आणि एटीएम लुटण्याच्या घटनाही समोर आल्या. या लुटीतून दहशतवादी स्वत:सह संघटनेसाठी पैसा जमा करायचे.