EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 11:48 PM2024-05-19T23:48:48+5:302024-05-19T23:50:01+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील एटा येथील असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या व्हिडीओमध्ये एक तरुण हा आठ वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे.
सुरुवातीला हा व्हिडीओ सपा सुप्रिमो ने शेअर केला होता. तसेच निवडणूक आयोगाला हे चुकीचं घडलंय, असं वाटत असेल तर त्यांनी कारवाई करावी. भाजपाची बुथ कमिटी ही प्रत्यक्षात लूट कमिटी आहे, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हाच व्हिडीओ राहुल गांधी यांनीही शेअर केला.
राहुल गांधी यांनी ही पोस्ट शेअर करताना लिहिलं की, पराभव समोर दिसू लागल्याने भाजपा जनादेश धुडकावण्यासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव आणून लोकशाहीची लूट करू इच्छित आहे. निवडणूक ड्युटीवर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावासमोर आपल्या घटनात्मक जबाबदाऱ्या विसरू नयेत, अशी अपेक्षा काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे. अन्यथा इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर अशी कारवाई केली जाईल, की पुढे कुणीही घटनेच्या शपथेचा अपमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल, असा सक्त इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.
अपनी हार सामने देख कर भाजपा जनादेश को झुठलाने के लिए सरकारी तंत्र पर दबाव बना कर लोकतंत्र को लूटना चाहती है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 19, 2024
कांग्रेस चुनावी ड्यूटी कर रहे सभी अधिकारियों से यह अपेक्षा करती है कि वो सत्ता के दबाव के सामने अपनी संवैधानिक ज़िम्मेदारी न भूलें।
वरना INDIA की सरकार बनते ही ऐसी… https://t.co/fk4wXL8QZy
दरम्यान, हा व्हिडीओ हआ एटा येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. एका अल्पवयीन मुलाने भाजपाला आठ वेळा मत दिल्याचा दावा करण्यात येत आहे. ही बुथ कॅप्चरिंगची घटना असल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण हा ईव्हीएमजवळ उभा आहे. तसेच तो या व्हिडीओमध्ये आठ वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. मात्र हा व्हिडीओ खरा असल्याचा कुठलाही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.