भयंकर! पाणीपुरी विक्रेत्याने पैसे साठवून घेतला सेकंड हँड मोबाईल; खिशातच झाला स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:33 IST2025-03-19T11:33:10+5:302025-03-19T11:33:57+5:30
बाईकवरून जाणाऱ्या एका तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

भयंकर! पाणीपुरी विक्रेत्याने पैसे साठवून घेतला सेकंड हँड मोबाईल; खिशातच झाला स्फोट
मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवरून जाणाऱ्या एका तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तरुण बाईकवरुन खाली पडला, ज्यामुळे त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली. जखमी तरुणाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
सारंगपूर येथील रहिवासी अरविंद (१९) हा पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करतो. मंगळवारी तो बाजारातून भाजीपाला खरेदी करून नैनवाडा या आपल्या गावी परतत होता. अचानक त्याच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे अरविंदचा तोल गेला आणि तो बाईकवरून खाली पडला. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली.
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या मदतीने त्याला ताबडतोब रुग्णवाहिकेने सारंगपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला शाजापूरला रेफर करण्यात आले. अरविंदच्या भावाने सांगितलं की, त्याने पैसे साठवून एक जुना मोबाईल खरेदी केला होता. रात्रभर मोबाईल चार्ज केल्यानंतर तो खिशात ठेवला आणि भाजी आणायला बाजारात गेला. परत येताना ही घटना घडली..
मीरा मोबाईल ऑपरेटर भगवान सिंह राजपूत म्हणाले की, बऱ्याचदा जुन्या मोबाईलमधील खराब बॅटरी चिनी बॅटरीने बदलली जाते जी फार टिकाऊ नसते. त्यांनी सांगितलं की, जर अशी बॅटरी एका तासापेक्षा जास्त काळ चार्ज केली तर ती गरम होऊन स्फोट होण्याचा धोका असतो. लोकांनी जुने किंवा दुरुस्त केलेले मोबाईल फोन खरेदी करणं टाळावं आणि चिनी बॅटरी वापरताना काळजी घ्यावी.