नवी दिल्ली - भररस्त्यात महिलेवर अन्याय, अत्याचार होत असताना अनेकजण फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे गुन्हा करणाऱ्याची हिम्मत वाढते. दिल्लीमध्येही भरस्त्यात असाच प्रकार सुरु असताना मदतीसाठी पुढे आलेल्या युवकाला भोसकण्यात आले. पश्चिम दिल्लीच्या इंदरपुरीमध्ये शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. ललित (20) असे जखमी युवकाचे नाव असून तो आपल्या कारने जात असताना त्याला एका महिलेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ही महिला मदतीसाठी याचना करत होती. ललितने लगेच आपली कार त्या महिलेच्या दिशेने वळवली.
त्या महिलेला तिचा पती मोहम्मद इख्तियार मारहाण करत होता. ललितने हस्तक्षेप करुन तिच्या नवऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतापलेल्या महिलेच्या पतीने ललितला खेचून त्याच्या गाडीच्या बाहेर काढले व त्याला भोसकले. या हल्ल्यात ललितच्या मानेला आणि हाताला मार लागला आहे. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ललितला जवळच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्याला रात्री घरी सोडण्यात आले.
मी माझी गाडी पार्क करण्यासाठी जात होतो. त्यावेळी एक व्यक्ती महिलेवर ओरडत असल्याचे मी पाहिले. त्याच्या हातात चाकू होता. मी लगेच माझी कार त्या दिशेने वळवली. रस्त्याच्या मधोमध त्यांच्यामध्ये वाद सुरु होता. यावेळी अनेकजण फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये होते. तो पुरुष महिलेवर हल्ला करेल अशी स्थिती होती. त्यामुळे महिलेला वाचवण्यासाठी म्हणून मी हस्तक्षेप केला असे ललितने सांगितले.
मोहम्मद इख्तियारने माझ्याकडे काहीवेळासाठी पाहिले व पुन्हा पत्नीला शिवीगाळ सुरु केली. ललितने पुन्हा हस्तक्षेप करुन रोखले व गाडी पुढे नेली. त्यावेळी इख्तियारने ललितला गाडी बाहेर पडण्यास सांगितले. आरोपीने ललितच्या कॉलरला पकडून गाडी बाहेर खेचले व त्याच्यावर वार केले. दोघांमध्ये संघर्ष सुरु असताना ललितने त्याच्या हातातला चाकू पकडून ठेवला. त्यामुळे हाताचे तळवे रक्तबंबाळ झाले. रक्त पाहिल्यानंतर इख्तियार घाबरला व तिथून पळून गेला.