मध्य प्रदेशातील कोविड रुग्णालयात दिवस-रात्र झटतोय मराठमोळा तरुण डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 04:36 PM2020-05-06T16:36:05+5:302020-05-07T09:30:36+5:30
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पदव्युत्तर (MS) शिक्षण घेत असलेला मराठामोळा तरुण डॉक्टर सध्या कोविड १९ च्या वार्डमध्ये रुग्णांवर उपचार करत आहे.
मयूर गलांडे
मुंबई - देशावर आलेल्या प्रत्येक लढाईत महाराष्ट्र नेहमीच आपलं योगदान देत राहिला आहे. महाराष्ट्र ही लढवय्यांची भूमी आहे, म्हणूनच सीमारेषेवर लढणाऱ्या जवानांपासून ते लष्करप्रमुखांपर्यंत मराठी माणूस देशसेवा करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सुपुत्र विदेशातही आपलं योगदान देत आहेत. सध्या देशावर कोरोनाचं संकट असून कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्र पायाला भिंगरी लावून जीवाची जोखीम पत्करुन सेवा बजावत आहे. मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवाशी असलेला एक युवक डॉक्टरमध्य प्रदेशच्या जबलपूर येथील कोविड १९ च्या वार्डमध्ये कर्तव्य बजावत आहे. दिवसा आणि रात्रपाळीत आपलं कर्तव्य बजवाताना हा तरुण डॉक्टरमध्य प्रदेशात महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्वही करतोय.
देशावरील कोरोनाच्या संकटात प्रत्येकजण आपलं योगदान देत आहे. अगदी किराणा दुकानदारांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि देशाच्या पंतप्रधानांपर्यत सर्वचजण कोरोनाशी दोनहात करताना दिसत आहेत. मुख्यत्वे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी स्वत:ला वाहून घेतलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थीही जीव धोक्यात घालून या लढाईत उतरले आहेत. मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पदव्युत्तर (MS) शिक्षण घेत असलेला मराठामोळा तरुण डॉक्टर सध्या कोविड १९ च्या वार्डमध्ये रुग्णांवर उपचार करत आहे. मयूर कबाडे असे या डॉक्टरचे नाव असून ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवाशी आहेत.
कबाडे यांनी कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातून २०१६ साली एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर, काही दिवस बार्शीतील खासगी रुग्णालयात प्रॅक्टीस केल्यानंतर २०१९ मध्ये मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर (MS) ईएनटी शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला. सध्या, याच वैद्यकीय महाविद्यालयात ते ईएनटी विभागातील पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहेत. सध्या पीजी शिक्षण घेत असतानाच एवढ्या मोठ्या महामारीच्या कामाचा अनुभव ही आयुष्यात मिळालेली मोठी संधी असल्याचे मी मानतो, असे कबाडे यांनी लोकमतशी बोलताना म्हटले.
सुरुवातीला जेव्हा कोविड १९ च्या युनिटमध्ये माझी नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी मनात भीती आणि काम करण्याचा उत्साह, दोन्हीही होते. ईएनटी विभागात असल्याने रुग्णांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे नमुने घेण्याचं काम माझ्याकडे आहे. यामध्ये अधिक काळजी घ्यावी लागते. माझ्या कुटुंबीयांमध्ये कुणीही वैद्यकीय क्षेत्रात नसून मीच पहिला व्यक्ती डॉक्टर आहे. त्यातच, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे, कुटुंबीय जास्त काळजी करतात. दररोजची ड्युटी संपल्यानंतर घरी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधतो. त्यावेळी, आई-वडिलांकडून सातत्याने काळजी घे... काळजी घे.. हेच ऐकायला मिळते, असेही कबाडे यांनी म्हटले. सरकार आणि प्रशासनाकडून आम्हाला मास्क, पीपीई कीट पुरविण्यात येत आहे. मात्र, अद्यापही अनेक रुग्णालयांमध्ये याची गरज भासत आहे. ज्याप्रमाणे आमच्याकडून रुग्णांची काळजी घेतली जातेय, त्याचप्रमाणे डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पीपीई कीट आणि एन ९५ मास्कची आवश्यक तितकी उपब्धतता करुन द्यायलाच हवी, अशी अपेक्षाही कबाडे यांनी व्यक्त केली. तर, नागरिकांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे, पण लोकांनी घराबाहेर पडू नये. सरकारने दिलेली शिथिलता म्हणजे कोरोना संपला असे नाही. त्यामुळे, लोकांनी घरातच बसावे, सरकारी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही कबाडे यांनी केले.
कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असल्याने आमचा कामाचा उत्साह अधिक वाढत आहे. सध्या मला १ मे ते १५ मे पर्यंत हॉस्पिटलमध्ये ड्युटी लावण्यात आली आहे. त्यानंतर, मला १५ दिवसांचे क्वारंटाईन करण्यात येईल. आम्ही सध्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात येत आहोत. त्यामुळे आमचे स्वॅब टेस्टींग होईल व ते निगेटीव्ह आढळल्यानंतरच आम्हाला पुन्हा रुग्णालयात ड्युटीसाठी जाता येईल.
आणखी वाचा
Coronvirusnews: कोरोनाच्या भीतीने शेवटची गळाभेटही नाही, वॉर्ड बॉय बापाची ह्रदयद्रावक कहानी
CoronaVirus News : कोरोनाच्या लढाईत कसं काम करतंय मोदी सरकार; भारतीय म्हणतात...