नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी सोमवारी ७४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. मी मनाने ७४ वर्षांचा तरुण आहे आणि वाढदिवशीही माझ्या मनात देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलचे विचार घोळत आहेत, असे पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे. त्यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांनी हे टष्ट्वीट केले आहे.चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, आपल्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा कुटुंबियांनी माझ्यापर्यंत पोहोचविल्या. मी ७४ वर्षांचा झालो आहे, ही जाणीव या वाढदिवसामुळे मला झाली. या शुभेच्छांमुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे.आणखी एका टष्ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वाढदिवशीही मी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करीत बसलो आहे. आॅगस्ट महिन्यात देशाचा निर्यात वृद्धीदर -६.०५ टक्के इतका नोंदविला गेला. दरवर्षाचा निर्यात वृद्धीचा दर २० टक्के इतका गाठल्याशिवाय कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाचा वृद्धीदर ८ टक्क्यांचा पल्ला गाठूच शकणार नाही.>अग्निपरीक्षेतून दोषमुक्त होतील - जयराम रमेशकाँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, चिदम्बरम हे सध्या अग्निपरीक्षेतून जात आहेत. त्यातूनही ते दोषमुक्त होतील. मी चिदम्बरम यांच्यासोबत १९८६ सालापासून काम सुरू केले. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले.काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल व महिला काँग्रेसनेही चिदम्बरम यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.>वेणुगोपाल म्हणाले की, सध्या सुरू असलेले सुडाचे राजकारण चिदम्बरम यांचा पराभव करू शकणार नाही. चिदम्बरम यांचे चिरंजीव खा. कार्ती यांनी आपल्या वडिलांना उद्देशून म्हटले आहे की, ५६ (इंची छाती) वाले तुमचे काहीच वाईट करू शकणार नाहीत.
''मनाने तरुणच, डोक्यात अर्थव्यवस्थेचाच विचार''
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 4:58 AM