नवी दिल्ली : धार्मिक बाब म्हणून दाढी न करणाऱ्या एका मुस्लीम जवानास भारतीय लष्करातून बडतर्फ करण्यात आले असून, ‘दाढी राखणे ही इस्लामची मूलभूत धार्मिक बाब नाही,’ असे म्हणून सशस्त्र सेनादल न्यायाधिकरणानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.मूळचा कर्नाटकमधील धारवाड येथील ३४ वर्षांच्या मक्तुमहुसैन या जवानाने त्याच्या कमांडिंग आॅफिसरने सांगूनही दाढी काढलीनाही म्हणून लष्कराने त्याला ‘अवाच्छिंत जवान’ ठरवून सेवेतून बडतर्फ केले होते. याविरुद्ध मक्तुमहुसैनने सेनादल न्यायाधिकरणाच्या कोची खंडपीठाने त्याची याचिका फेटाळली. याविरुद्ध मक्तुमहुसैन सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या तयारीत आहे.न्यायाधिकरणापुढे मक्तुमहुसैन याचे वकील अॅड. सी. आर. रमेश यांनी प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले होते. एक, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ अन्वये मला स्वधर्माचे आचरण करण्याचा मूलभूत हक्क आहे. दाढी राखणे ही इस्लामची ओळख असल्याने तो धर्माचरणाचाच एक भाग आहे. दोन, लष्करात शीख सैनिकांना दाढी राखू दिली जाते व इतरांना नाही. हा पक्षपात आहे. त्यामुळे समानतेच्या न्यायतत्त्वाचा भंग होतो. हा युक्तिवाद अमान्य करताना न्यायाधिकरणाने म्हटले की, मक्तुमहुसैन यास स्वधर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे. परंतु लष्करासारख्या शिस्तबद्ध दलात नियमाचे पालन हे व्हायलाच हवे. शीख धर्मात केस व दाढी राखणे हा धर्माचरणाचा एक मुख्य भाग आहे. तसे इस्लामचे नाही. त्यामुळे लष्करात असलो तरी इस्लामचे पालन करण्यासाठी म्हणून मी दाढी करणार नाही, हे मक्तुमहुसैनचे वर्तन तद्दन बेशिस्तीचे आहे. शिखेतर कोणालाही सैन्यसेवेत असताना कायमची दाढी ठेवण्यास पूर्ण मनाई आहे. शीख नसलेल्या सैन्यदलातील जवानाने धर्माचरणाचा भाग म्हणून दाढी राखण्याचा आग्रह धरणे हे लष्करी शिस्तीच्या विरुद्ध आहे.तिन्ही सेनादलांचे वेगळे नियमदाढी राखण्याच्या बाबतीत लष्कर, हवाई दल व नौदल या तीन सेनादलांच्या शिस्तनियमांत एकवाक्यता नाही.तिन्ही सेनादलांमध्ये शिखांना व्यवस्थित चापून-चोपून बसविलेली दाढी व न कापलेले केस राखण्यास परवानगी आहे.लष्कराच्या काही रेजिमेंटमध्ये शिखेतर जवान व अधिकाऱ्यांना तात्पुरती दाढी राखता येते.ज्यावरून त्या व्यक्तीचा धर्म स्पष्ट होईल असे कोणतेही चिन्ह धारण करण्यास किंवा वेषभूषा करण्यास हवाई दलात सर्वांनाच ड्युटीच्या वेळी अथवा परेडच्या वेळी पूर्ण मज्जाव आहे.मात्र ज्या मुस्लीम व्यक्तींची हवाई दलात १ जानेवारी २००२ पूर्वी भरती झालेली असेल व भरतीच्या वेळी ज्यांची दाढी असेल त्यांना ती राखण्याची अनुमती आहे.नौदलाचे अधिकारी व नौसैनिकांना दाढी-मिशांसह आपले रुपडे बदलता येते. मात्र त्यासाठी कमांडिग आॅफिसरची पूर्वानुमती आवश्यक असते.
दाढी राखणारा मुस्लिम जवान लष्करातून बडतर्फ!
By admin | Published: June 05, 2016 3:56 AM