मध्यप्रदेशात ऑनलाईन गेमच्या नादात तरुणीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:37 AM2021-09-07T05:37:32+5:302021-09-07T05:38:50+5:30
खळबळजनक : पबजी खेळताना कर्ज झाल्याची शंका
इंदूर (मध्यप्रदेश) : गावाहून १५ दिवसांपूर्वी आपली आई आणि भावाकडे काॅम्प्युटर कोर्स करण्यासाठी आलेल्या तरुणीने शनिवारी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राधा उर्फ रक्षा (२०) असे तिचे नाव असून ती ऑनलाईन खेळ खेळत होती व कंपनीकडून तिला कॉल येत होते. यामुळे ती तणावाखाली होती, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. ही घटना हिरानगर पोलीस हद्दीतील न्यू गौरी नगरमधील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राधाचा भाऊ संजय कामावरून सायंकाळी घरी आल्यावर राधाने त्याला किराणा सामान आणण्यास पाठविले. साधारण अर्ध्या तासात संजय परत आला तेव्हा राधा फासावर लटकलेली होती. तिला एम. वाय. रुग्णालयात नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संजयने तिला ऑनलाईन गेम पबजी खेळण्याचा नाद होता, असे सांगितले. एक दोन दिवसांपासून ती तणावाखाली होती. तिच्या मोबाईलवर कंपन्यांचे व्हॉटसॲप कॉल्सही सापडले. ते कॉल्स त्याने पोलिसांना दिले. शंका अशी व्यक्त केली जात आहे की, ऑनलाईन गेम खेळण्यामुळे राधावर कर्ज झाले होते.
आई-वडील करतात मजुरी
तपास करणारे अधिकारी किशोर कुमार म्हणाले की, ‘सध्या पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. राधाचे वडील गावात मजुरी करतात. तिचा भाऊ इंदूरमध्ये ॲल्युमिनियमचे काम करतो. राधाची आईदेखील मजुरीच्या कामात आहे. सुसाइड नोट मिळाली नाही. परंतु, जे मोबाईल क्रमांक मिळाले त्यांचा तपास केला जात आहे.’ तपासानंतरच मृत्यूबद्दल काही सांगता येईल, असेही ते म्हणाले.