नवी दिल्ली : दिल्लीच्या तुगलकाबाद भागातील एका हॉटेलमध्ये ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करणाऱ्या रणवीर सिंग नावाच्या ३९ वर्षांच्या कामगाराचा सुमारे २०० किमी चालून आग्रा येथे पोहोचल्यावर शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला.
तो मुळचा मध्य प्रदेशाच्या मोरेना जिल्ह्यातील बदरफा गावातील होता व ‘लॉकडाऊन’मुळे शेकडो किमी चालत मूळ गावी निघालेल्या अन्य हजारो मजूर व कामगारांप्रमाणे तोही घरी जात होता. रणवीर सिंगला तीन लहान मुले असून तीनच वर्षांपूर्वी तो दिल्लीच्या या हॉटेलात नोकरीस होता. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब असून कोरडवाहू शेती आहे.
दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. २ वरून गुरुवारी दुपारी निघालेला रणवीर सिंग सुमारे २०० किमी चालून आग्रा शहरापासून जवळच असलेल्या कैलास मोड येथे पोहोचला व एकदम खाली कोसळला. जवळच्याच एका दुकानदाराने हे पाहिल्यावर त्याने रणवीर सिंगला चटईवर झोपवले व चहा आणि बिस्किट खायला दिले.
छातीतील असह्य वेदनांनी तो विव्हळत होता. तशाही अवस्थेत त्याने मोबाईलवरून गावी आपल्या भावाला फोन केला व आपल्या अवस्थेची त्यास माहिती दिली. पण थोड्याच वेळाने तो बसल्या जागीच गतप्राण झाला, असे सिकंदरा पोलिसांनी सांगितले. उत्तरीय तपासणीत त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले. कदाचित रणवीर सिंगला आधीपासूनच हा आजार असावा व अन्नपाण्याविना उन्हातून एवढे अंतर चालण्याच्या श्रमाने त्याची प्रकृती अचानक ढासळली असावी, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.