नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. आई-वडिलांचं छत्र हरपल्याने अनेक जण अनाथ झाले आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. आधी आई गेली नंतर बाबा पण मुली हरल्या नाहीत मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींनी संघर्ष केल्याची घटना समोर आली आहे. आई-व़डिलांचं छत्र हरपलं पण त्यांनी पैसे उधार घेऊन मोठ्या बहिणीचं लग्न लावलं आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर सहा मुली पोरक्या झाल्या. सहापैकी चौथ्या क्रमांकाच्या बहिणीने या घटनेनंतर कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.
मोठ्या बहिणीचं तिने लग्न करून दिलं असून लहान बहिणींचा ती सांभाळ करत आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चार अविवाहित बहिणी अनाथ झाल्या. कुटुंब कसं चालवावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. वडिलांच्या उपचारांसाठी आणि दुकानासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं आव्हान होतं पण यासर्व समस्यांवर मात करण्याचा निर्णय रेश्मानं म्हणजेच चौथ्या क्रमांकाच्या मुलीनं घेतला. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकारकडून मदत मिळते असं समजल्यावर या बहिणींनी वडिलांच्या निधनानंतर मदतीसाठी अर्ज केला. अनेकदा चकरा माराव्या लागला. त्यानंतर 5-6 महिन्यांनी 20 हजार रुपयांची मदत मिळाली मात्र मुख्यमंत्री कोविड चाइल्ड केअर योजनेतून कोणताही लाभ मिळाला नाही.
अधिकाऱ्यांनी तुमच्या वडिलांचा मृत्यू जानेवारीत झाला आहे. ज्या मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मार्च ते जून 2021 या कालावधीत मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी ही योजना होती असं सांगितलं. महिला बालकल्याण विभागाकडून अधिकाऱ्यांना अशा कुटुंबांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या बहिणींकडून वडिलांच्या कोरोनावरच्या उपचारांची कागदपत्रं मिळवली आणि या वर्षापासून स्पॉन्सर योजनेतून दोन हजार रुपये प्रति महिना पेन्शन सुरू केलं. रेश्माने वडिलांचं बंद असलेलं किराणा दुकान पुन्हा सुरू केलं आणि मोठ्या बहिणीला देखील आधार दिला
भोपाळ जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेंद्र सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वडिलांच्या निधनामुळं हे कुटुंब अडचणीत सापडलं आहे. कोविडमुळे वडिलांचं निधन झाल्यानं त्यांना 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. दोन अल्पवयीन बहिणींना चार हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येणार आहे. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. आरोग्यविम्यासोबतच दोन्ही मुलींचं वय 23 वर्षं पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यात एकरकमी निधी जमा होईल." रेश्माने लग्नासाठी काही पैसे जमा केले. ओळखीच्यांकडून सामान उधार घेतलं आणि सर्व बहिणींनी मिळून मोठ्या बहिणीचं लग्न लावून दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.