तिरुअनंतपूरम - नुकत्याच झालेल्या केरळमधील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीनंतर एका तरुणीने नवीन विक्रम रचला आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममधील २१ वर्षीय आर्या राजेंद्रन देशातील सर्वात तरुण महापौर बनल्या आहेत. आर्या राजेंद्रन यांनी आज तिरुअनंतपूरमच्या महापौरपदाची शपथ घेतली. या निवडीमुळे आर्या यांनी नवी मुंबईचे महापौर संजीव नाईक यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
माकप जिल्हा व राज्य समितीने एकमताने महापौर पदासाठी तिची उमेदवारी मंजूर केली होती. त्यानुसार, आज जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी आर्या राजेंद्रन यांना महापौरपदाची शपथ दिली. आर्या यांनी 99 पैकी 54 मते मिळवून महापौर पदासाठी विजय मिळवला. तिरुवअनंतपूर महापालिकेतील 100 सदस्यांच्या जागांपैकी सीपीएम आणि डीएलएफ आघाडीने 51 जागांवर विजयी होत बहुमत मिळवले आहे. त्यानंतर, भाजपाने 34 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले असून काँग्रेस आघाडीला 10 जागांवर विजय मिळवता आला आहे.
तिरुअनंतपुरममधील सर्व संत महाविद्यालयात बीएससी गणित या विषयात द्वितीय वर्षाला त्या सध्या शिकत आहे. आर्या राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय असून भारतीय विद्यार्थी महासंघाची राज्य समिती सदस्य आहे. सध्या ती बालसंग्रामच्या केरळ अध्यक्षा आहे. एवढंच नाही तर आर्या राजेंद्रनन यांची महापौर पदी निवड झाल्यामुळे त्यांनी नवी मुंबईचे महापौर संजीव नाईक यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कारण, संजीव नाईक हे वयाच्या 23 व्या वर्षी महापौर झाले होते. देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम नाईक यांच्या नावावर होता. मात्र, आता 21 वर्षीय आर्याने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.
आर्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुडावनमुगल येथून निवडून आली आहे. आर्याने यूडीएफच्या उमेदवार श्रीकला यांना दोन हजार ८७२ मतांनी हरवले. तसेच आर्या ही २०२० च्या निवडणुकीमधील सर्वात तरुण उमेदवारही ठरली आहे. निवडणुकीपूर्वी तिने सांगितले होते की, “जर ती निवडून आली तर आधी चालू असलेली अन्य विकासकामे सुरू तर ठेवणारच. पण प्राथमिक शाळांच्या श्रेणी सुधारित करण्यावर आपला भर असेल”. तसेच, या जबाबदारीने आपल्या शिक्षणातही खंड पडू देणार नसल्याचे आर्याने म्हटले आहे.