लखनौ - केंद्रीयमंत्री मनोज सिन्हा यांनी भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना विरोधकांना थेट धमकी दिली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनाकडे बोट दाखवल्यास पुढील 4 तासांत तुमचं बोट (सलामत) जागेवर राहणार नाही, अशी सज्जड दमच सिन्हा यांनी दिला आहे. गाझीपूरमधील सदीपुरा येथील किसान पंचायत संमेलनात भाषण करताना सिन्हा यांनी धमकी दिली.
भाजपा नेते आणि कार्यकर्ते भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीतून तयार होणाऱ्या पैशाचा नायनाट करण्यास सक्षम आहेत. पूर्वांचलमधील कुणीही गुन्हेगार, कुणाचीही लायकी नाही की गाझीपूर येथे येऊन भाजपा कार्यकर्त्यांकडे बोट दाखवावे. तसे केल्यास त्यांचे बोट सलामत राहणार नसल्याचे सिन्हा यांनी म्हटले. सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच, सोशल मीडियावर त्याच्या या वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर अनुक्रमे 72 आणि 48 तासांची बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी कडक पाऊले उचलली आहेत. भाजपाच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावरही बंदी आणण्यात आली आहे.