Bangladesh Hindu News: बांगलादेशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून, हिंदुंवरील वाढते अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इस्कॉनचे चिन्मन कृष्णा दास यांच्या अटकेनंतर भारतानेही नाराजी व्यक्त केली. आता इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पाई यांनी भारतीय वंशाचे अमेरिकेतील उद्योगपती विनोद खोसला यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोहनदास पाई यांनी बांगलादेशातहिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मोहम्मद युनूस यांच्या सरकारच्या काळात होत असलेल्या घटनांवरून विनोद खोसला यांना लक्ष्य केलं आहे.
पाई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी विनोद खोसला यांना सवाल केला आहे. "तुम्ही तुमच्या जवळचा मित्र मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदुंवरील नरसंहाराविरोधात बोलणार आहात का? कट्टर जिहादी रस्त्यावर हिंदुंना मारलं जात आहे आणि तुमच्यासारखे लोक युनूस यांचे कौतूक करत आहेत. विनंती आहे की, मानवाधिकारांसाठी उभे रहा", असे पाई यांनी म्हटले आहे.
पाई यांनी खोसला यांच्यावर टीका का केली?
विनोद खोसला यांनी ७ ऑगस्ट रोजी एक विधान केले होते. विनोद खोसला यांनी शेख हसीना राजीनामा देऊन देशातून फरार झाल्या आणि मोहम्मद युनूस यांना सरकारचे प्रमुख केल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता खोसलांनी म्हटले होते की, बांगलादेशातील अंतरिम सरकारचं नेतृत्व नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस करतील. मी खूप आनंदी आहे, कारण मी त्यांचा चाहता आहे.
चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेनंतर भडकली हिंसा
बांगलादेशातील चटगाव इस्कॉन धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास यांना अटक करण्यात आली. देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आल्यानंतर बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला. अटकेचा विरोध करण्यासाठी हिंदू रस्त्यावर उतरले. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले.