नवी दिल्ली : हरयाणातील सरकार स्थापन करण्यासाठी आपने भाजपने आतून मदत केल्याचा आरोप दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांनी पत्रकार परिषदेत केला.
दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलताना चोपडा यांनी भाजप व आपवर टीकास्त्र सोडले. हरयाणात भाजपने जेजेपीचे समर्थन घेतले आहे. यासाठी जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांना तिहार तुरुंगातून सोडण्यासाठी आपची भाजपला मदत झाल्याचा आरोप केला आहे.
जेजेपीसोबत आपने हरियाणात आघाडी केली होती. यासाठी तिहार कारागृहात असलेल्या अजय चौटाला यांना संचित रजेवर सोडण्यात आले आहे. तिहार तुरुंग दिल्ली सरकारच्या अखत्यारित येतो. दिल्ली सरकारच्या संमतीशिवाय तिहार तुरुंगातून एकही कैदी सुटू शकत नाही. अजय चौटाला यांना संचित रजेवर सोडण्यासाठी भाजपने आपशी समझोता केल्याचा आरोप चोपडा यांनी केला. संचित रजेसाठी २ हजारांवर कैद्यांचे अर्ज असताना केवळ अजय चौटाला यांना सोडण्यामागे निश्चितपणे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष किर्ती आझाद, मुकेश शर्मा, अरविंदर सिंग लवली उपस्थित होते.