मुंबई - देशात गुरुवारी प्रथमच कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येते. देशात घोषित करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाचे गांभीर्य सर्वत्र दिसून येत होते. मात्र, हळू हळू कोरोना महामारीतील लोकांचा इंटरेस्ट, गांभीर्य कमी होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले. आंध्रात रुग्णांची संख्या ८४५ ने वाढली. या सहा राज्यांतील रुग्णांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या तब्बल १ लाख ८६ हजार ६२६ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण जूनमध्ये वाढले आणि १ जून ते २ जुलै या काळात ४ लाख ३५ हजार जणांना संसर्ग झाल्याचे चाचण्यांतून दिसून आले. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. कारण, लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. सरकारच्या सूचनांचं किंवा प्रशासनाच्या नियमांचं पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही.
अभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका वाक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सध्याची परिस्थिती अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. कोरोना महामारीबद्दल सध्या लोकांमध्ये गांभीर्य दिसत नसून देश अनलॉक झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर, लोकांमध्ये कोरोनाची भीतीही राहिली नसल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन अतुल कुलकर्णीने इंग्रजीतील एक वाक्य लिहिले आहे. महामारीतील आपला इंटरेस्ट कमी झालाच पाहिजे, पण महामारीचा तुमच्यातील रस कमी होणार नाही, असे वाक्य लिहित, द इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्राचा संदर्भही अतुल कुलकर्णीने जोडला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना, कोरोनासोबत जगायची आपली तयारी आहे, पण कोरोनाची तयारी आहे का आपल्याला सोबत घेऊन जगू द्यायची, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वाक्य चर्चेचा विषय बनले होते.