ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्ली क्रिकेट संघटनेमध्ये चालणा-या भ्रष्टाचाराची पूर्ण माहिती होती. ते डीडीसीएमधील भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप बुधवारी आम आदमी पक्षाने केला.
आरोपाच्या समर्थनार्थ आम आदमी पक्षाने दोन पत्र सादर केली. अरुण जेटली यांनी दिल्ली पोलिसांना ही पत्र लिहील्याचा आरोप आपने केला. अरुण जेटली यांनी २७ ऑक्टोंबर २०११ आणि पाच मे २०१२ रोजी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहीले. पाच मे रोजी दिल्ली पोलिस आयुक्त रणजीत नारायण यांना लिहीलेल्या पत्रात सिंडिकेट घोटाळा प्रकरणात डीडीसीए विरोधातील तक्रार पूर्णपणे निराधार आहे.
पोलिसांकडून तेच तेच प्रश्न विचारले जात असल्यामुळे छळ होत असल्याची डीडीसीए पदाधिका-यांची भावना आहे असे जेटली यांनी पत्रात लिहीले होते. गुन्हेगारीच्या तपासात हे थेट हस्तक्षेप नाही का ? असा सवाल आप नेते आशुतोष यांनी विचारला.