ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - ख्यातनाम पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांचा कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये ८ नोव्हेंबर रोजी होणार असून हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आवश्यकता भासल्यास आम आदमी पार्टीचे सैनिक तैनात केले जातील असं पक्षाने स्पष्ट केले आहे.
अर्थात, या कार्यक्रमाला सुरक्षा पुरवणं ही प्रामुख्यानं दिल्ली पोलीसांची जबाबदारी असल्याचं आपचे नेते संजय सिंग यांनी गुरुवारी सांगितले. शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतर मुंबईतला गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द झाला, आणि त्यानंतर दिल्ली व पश्चिम बंगालमधल्या सरकारांनी त्यांना आमंत्रण दिलं. आता ८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत हा कार्यक्रम करण्याचं निश्चित झालं आहे.
महाराष्ट्रातले पोलीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या भाजपाच्या अधिपत्याखाली आहेत, तर दिल्लीमधील पोलीस मोदी व राजनाथ सिंह यांच्या आदेशानुसार काम करतात. त्यामुळे गरज वाटलीच तर आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची फौज कार्यक्रम सुरळित पार पाडण्यासाठी तैनात करू असे संजय सिंह म्हणाले.
शिवसेनेने दिल्लीमधला कार्यक्रमही उधळण्याची कतित धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर संजय सिंह यांनी वरील उद्गार काढले आहेत.